पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ आणि समस्त माहेश्वरी समाज, पुणे यांच्या वतीने आयोजन
पुणे : पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळ जिल्हा सभा आणि समस्त माहेश्वरी समाजाच्या वतीने शनिवार दिनांक १५ जून रोजी महेश नवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांसह भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ जून रोजी सकाळी ७ वाजता नारायण पेठेतील श्री बालाजी मंदिरापासून शोभायात्रा निघणार आहे. टिळक चौक मार्गे टिळक स्मारक येथे शोभायात्रा समाप्त होणार आहे.
पारंपारिक वेशभूषेत महिला या शोभयात्रेत सहभागी होणार आहेत. मोठ्या संख्येने समाज बांधव या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. याआधी सकाळी ५.३० वाजता रविवार पेठेतील श्री हरिहर मंदिर येथे भगवान श्री महादेव जी यांचा अभिषेक होणार आहे. या महेश नवमी उत्सवात अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष संदीप काबरा, महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी महासभेचे मधुसूदन गांधी,उद्योजक ललित पोफळे, दक्षिणांचल उपसभापती अरुण भांगडिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शोभायात्रेत फुलांनी सजवलेली बग्गी असून बग्गीमध्ये शिवपार्वतीच्या वेशातील कलाकार असतील. याशिवाय घोडे, उंट शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. गंगा अवतरण, महेश उत्पत्ती, बद्रीनाथ, केदारनाथ, शिव परिवार अशा प्रतिकृती आणि प्रसंग सादरीकरण शोभायात्रेत होणार आहे. याशिवाय नगारा वादन, शंख वादन देखील होणार आहे.
आज शिक्षण, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकारण, न्यायव्यवस्था, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात माहेश्वरी समाजाचे अमुल्य योगदान आहे. समस्त समाजाचे ऋण फेडत सगळ्यांना लाभ व्हावा म्हणून झटणारा समाज आहे. सेवात्याग – सदाचार हेच आपले कर्तव्य मानणारा आणि ते पार पाडणारा हा माहेश्वरी समाज आहे.
काळानुरूप पारंपारिक व्यवसायाची कास सोडत आता नवी पिढी ही प्रशासकीय सेवा, सेनादल, पोलिस, राजकारण इत्यादी क्षेत्रातही आपले नाव उमटवू पाहत आहे. यात पुण्यातले माहेश्वरी युवक अभिमानास्पद कामगिरी बजावत आहेत. आषाढी वारीत माहेश्वरी समाजाचीही दिंडी असते. माहेश्वरी समाजाची पुण्याशी किती नाळ जुळलीये, हे वेगळे सांगावे लागत नाही. सांस्कृतीक आणि सामाजिक भान ठेवत माहेश्वरी समाजाने इथे ऋणानुबंध जपलेत. ताराचंद हॉस्पिटल, महेश सांस्कृतिक भवन सारख्या संस्था हे त्याचेच द्योतक आहे.
महेश सहकारी बँक, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ या अनेक सामाजिक संस्था, पतपेढी, बँक, मंदिरे तसेच पुण्यात माहेश्वरी होस्टेल ची स्थापना माहेश्वरी समाजाने केली आहे. सेवा, त्याग, सदाचार या वाक्याला अनुसरून माहेश्वरी समाज कार्य करत असते.