मुंबई, 11 जून 2024
18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(मिफ्फ) चित्रपटनिर्मिती आणि कला या क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या व्यक्तिमत्वांपैकी काहींना पाचारण करण्यात आले असून त्यांच्या उपस्थितीत अतिशय उल्लेखनीय मास्टरक्लासेसच्या मालिकेच्या आयोजनाची घोषणा करताना महोत्सवाच्या आयोजकांना आनंद होत आहे. पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलकांपासून ते द्रष्टे दिग्दर्शक आणि नवोन्मेषी ऍनिमेटर्ससारख्या मान्यवरांकडून होतकरू चित्रपटनिर्माते आणि चित्रपटप्रेमींना असाधारण अध्ययनाच्या संधीचा अनुभव देण्याची हमी मिफ्फ देत आहे.
या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 18वे पर्व 15 जून ते 21 जून या कालावधीत मुंबईत पेडर रोड येथील एनएफडीसी-फिल्म्स डिव्हिजनच्या संकुलात सुरू होणार आहे. सर्व मास्टर क्लासेसचे आयोजन याच संकुलात जे. बी. (जे. भावनगरी) सभागृहात होणार आहे. मिफ्फ 2024च्या प्रतिनिधींसाठी या पेटाऱ्यात काय आहे त्यावर एक नजर टाकूयाः
- अल्फॉन्स रॉय – संवर्धन उपक्रम आणि भारतीय वन्यजीव यावरील माहितीपट
18 जून – सकाळी 10:30
चित्रपट, टीव्ही, जाहिराती आणि संगीत या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अल्फॉन्स रॉय यांच्या सुप्रसिद्ध कारकीर्दीचा विविध क्षेत्रात विस्तार आहे. प्रतिष्ठेच्या फिल्म अँड टीव्ही इन्स्टिट्युट ऑफ तामिळनाडूचे पदवीधर असलेले रॉय यांनी गौर हरी दास्तान, लाईफ इज गुड आणि उरुमी यांसारख्या प्रशंसनीय चित्रपटांमध्ये आपल्या गुणवत्तेचे योगदान दिले आहे. प्रतिष्ठेच्या अनेक पुरस्कारांचे आणि सन्मानाचे ते मानकरी आहेत. यामध्ये तिबेट साठी प्राईमटाईम एम्मी आणि टायगर किल साठी ह्युगो टेलिव्हिजन पुरस्कार यांचा समावेश आहे. फिल्मफेअर नामांकन मिळालेल्या आमिर या त्यांच्या चित्रपटाबद्दल समीक्षकांनी देखील त्यांची प्रशंसा केली होती. संवर्धन उपक्रम आणि भारतीय वन्यजीव यावरील माहितीपटांवरील त्यांच्या मास्टर क्लासच्या माध्यमातून फिल्म्स कशा प्रकारे पर्यावरणीय समस्या, वन्यजीव अधिवास आणि पर्यावरण संवर्धनकर्ते यांच्या कार्याला जगासमोर आणतात यावर प्रकाश टाकतील. संयोजन, व्हॉईसओव्हर आणि सिनेमॅटोग्राफी या क्षेत्रातील व्यापक अनुभवाद्वारे पर्यावरणीय समस्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी तसेच भारताच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवण्यासाठी माहितीपट किती महत्त्वाचे आहेत यावर रॉय प्रकाश टाकतील.
- जॉर्जेस श्वाईजगेबेल- एक्स्प्लोअरिंग ऍनिमेशनः म्युझिक, सायकल्स अँड मेटामॉर्फोसिस
18 जून – दुपारी 1.45
नामवंत ऍनिमेशन दिग्दर्शक जॉर्जेस श्वाईजगेबेल यांच्या सोबतीने मंत्रमुग्ध करणाऱ्या ऍनिमेशन विश्वात संचार पाऊल टाका. फ्लाईट ऑफ इकारस हा त्यांचा पदार्पणातील चित्रपट त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीचा पाया ठरला आणि आता त्यांच्या या कारकिर्दीमध्ये 20 पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा समावेश आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जॉर्जेस श्वाईजगेबेल प्रतिष्ठेच्या अनेक पुरस्कारांचे आणि सन्मानांचे मानकरी ठरले आहेत. यामध्ये क्रिस्टल ऑफ द ऍनेसी महोत्सव, स्विस फिल्म ऍवॉर्ड ऑफ ऑनर आणि झाग्रेब ऍनिमाफेस्टमधील जीवनगौरव पुरस्काराचा समावेश आहे. ऑस्क ऍकॅडमीचे सदस्य म्हणूनही ते ओळखले जातात आणि त्यांना फ्रेंच सरकारने ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स या पदवीने गौरवले आहे. त्यांचा म्युझिक, मुव्हमेंट अँड मेटामॉर्फोसिस यावरील मास्टर क्लास हा एक वेगळा अनुभव असेल, ज्यामध्ये जॉर्जेस श्वाईजगेबेल यांच्या म्युझिक, सायकल्स अँड मेटामॉर्फोसिस यांच्या आवडीसह त्यांच्या ज्ञानाचा प्रभाव पाहायला मिळेल.
- ऑली हडलटन- मास्टर क्लास ऑन एडिटिंग: शेपिंग कॅरॅक्टर्स
20 जून – दुपारी 1:45 वाजता
चित्रपट संकलक ऑली हडलटन यांच्या संकलनाच्या कलेवर आधारित मास्टर क्लासमध्ये सहभागी व्हा. सुमारे 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आणि अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेल्या हडलटन यांना दोन वेळा बाफ्टा नामांकन मिळाले होते तसेच ते रॉयल टेलिव्हिजन सोसायटी पुरस्कारांचे दोन वेळा मानकरी ठरले. चित्रपट संकलनामधील त्यांचा व्यासंग दांडगा असून या क्षेत्रातील त्यांचा दृष्टीकोन या कलेसाठी महत्त्वाचा आहे. सिस्टर्स इन लॉ, होल्ड मी टाईट, लेट मी गो, द लिबरेस ऑफ बगदाद, रफ आन्टीज आणि ड्रीमकॅचर या त्यांच्या कलाकृतींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवली आहे. कान,आयडीएफए आणि सनडान्स यांसह अनेक चित्रपट महोत्सवात त्यांना प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत.
त्याच्या एडिटिंग – शेपिंग कॅरेक्टर्स’ या मास्टरक्लास मधून संपादनाच्या दृष्टिकोनातून आकर्षक व्यक्तिरेखा तयार करताना निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा शोध कसा घ्यायचा हे समजेल. प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि सखोल चर्चेद्वारे व्यक्तिचित्रे रंगवणे, कथेची रचना आणि कथानकाचे चित्र उभे करण्याची कला यासह संपादनाच्या विविध पैलूंचा शोध सहभागींना घेता येईल.
- नेमिल शाह – सामाजिक बदलासाठी लघुपटाची ताकद वापरणे
19 जून – सकाळी 10:30
चित्रपट आणि व्हिडीओ इन्स्टॉलेशनच्या क्षेत्रात आपल्या नाविन्यपूर्ण कामांमुळे परिचित असलेले प्रसिद्ध चित्रपट निर्माते नेमिल शाह शॉर्ट फिल्म्समुळे होणाऱ्या परिवर्तनाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. नेमिल शाह यांचे यश उल्लेखनीय असून त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहे. “दाल भट” या त्यांच्या पहिल्या लघुपटाने मोठी वाहवा मिळवली. या लघुपटाने प्रतिष्ठेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला आणि ऑस्करसाठी त्याने अधिकृत प्रवेश मिळवला. जगभरातून त्यासाठी त्यांचे कौतुक झाले.
शॉर्ट फिल्म्स आणि सोशल चेंज या विषयावर त्यांचा मास्टरक्लास चुकवू नका. लघुपटांचा समाजावर होणारा सखोल परिणाम या विषयावर ते बोलतील. सामाजिक भाष्य आणि कृतिशीलतेसाठी एक ताकदीचे साधन म्हणून लघुपटांचा उपयोग कसा करायचा याबद्दलच्या कौशल्यांविषयी नेमिल शाह त्यांचे अनुभव सांगणार आहेत.
- ऑड्रिअस स्टोनिस – कथा सांगण्याची कला: सर्जनशीलता आणि खासियत
18 जून – दुपारी 3
लिथुआनियन अकादमी ऑफ म्युझिक अँड थिएटरमधील एक प्रतिष्ठित चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि प्राध्यापक म्हणून स्टोनीस यांनी जागतिक चित्रपटसृष्टीवर अमिट छाप सोडली आहे. चित्रपट निर्मितीच्या कलेतील योगदानासाठी डॉक्टर ऑफ आर्ट्स आणि लिथुआनियन राष्ट्रीय संस्कृती आणि कला पुरस्काराचे ते मानकरी ठरले.
1992 मध्ये, “अर्थ ऑफ द ब्लाइंड” या स्टोनिसच्या माहितीपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांना मोहिनी घातली आणि युरोपियन फिल्म अकादमीने वर्षातील सर्वोत्कृष्ट युरोपियन डॉक्युमेंटरी फिल्म म्हणून तिचा गौरव केला. 1989 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर 20 हून अधिक फीचर फिल्म्स आणि 400 पेक्षा जास्त टेलिव्हिजन डॉक्युमेंट्रीजची निर्मिती करत सर्जनशीलता दाखवून दिली. कथाकथन आणि सर्जनशीलता या विषयावरील मास्टरक्लास मध्ये आकर्षक कथानक आणि नाविन्यपूर्ण तंत्रे याविषयीचे मते मांडून ऐकणाऱ्यांचे औत्सुक्य वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
त्यामुळे 18व्या मिफ्फमध्ये चित्रपट उद्योगातील सर्वोत्तम व्यक्तींकडून शिकण्याची ही अनोखी संधी चुकवू नका.
सिनेमॅटिक कथाकथन आणि कलात्मक अभिव्यक्तीचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्वरित नोंदणी करा. www.miff.in या संकेतस्थळाला भेट द्या.