
पुणे-अगदी १५ मिनिटांच्या पावसानेही पुणे शहर अक्षरशः पाण्यात बुडताना आपण गेल्या १० दिवसांत अनेकदा पाहिलं. असंख्य नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, कोट्यावधींची मालमत्ता अक्षरशः पाण्यात गेली. गेली जवळपास १० वर्षे गल्ली ते दिल्ली एकच पक्षाचा एकछत्री अंमल असताना महाराष्ट्रातील महत्वाच्या शहराची अशी अवस्था का झाली हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात आहे.
पुणे शहराच्या या अवस्थेची आज खा.सौ. सुप्रिया ताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पाहणी केली. शिवाजीनगर, पर्वती, खडकवासला, हडपसर या मतदारसंघात परिस्थिती अत्यंत बिकट असून विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेला वाऱ्यावर सोडल्याचा संताप पुणेकरांकडून व्यक्त केला जात आहे.
खा. सुप्रिया सुळे यांच्या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी पावसाळी कामे पूर्णच झाली नाहीत, तर अनेक ठिकाणी ऐन पावसाळ्यात खड्डे खोदून ठेवलेले आहेत हे निदर्शनास आले. ड्रेनेजसाठी टाकलेल्या पाईप मधून काही ठेकेदारांनी केबल टाकल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला. हा सगळा गैरप्रकार सुरू असताना शहरातील महायुतीचे आमदार झोपले होते का हा प्रश्न नागरिक विचारात आहेत.
नागरिकांच्या याच संतप्त भावना घेऊन खा. सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महानगरपालिका प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला.या प्रसंगी उदय महाले, निलेश निकम, श्रीकांत पाटील, विशाल तांबे, सचीन दोडके, काकासाहेब चव्हाण, नमेश बाबर, अमृताताई बाबर, अश्विनीताई कदम, नितीन कदम , किशोर कांबळे, अमोघ ढमाले उपस्तिथ होते.
