बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाने मुळशीत सेंद्रिय भात उत्पादनाचा टक्का वाढवणार : हणमंतराव गायकवाड
पौड (प्रतिनिधी) : मुळशी तालुक्यातील चवदार भात पिकाची मागणी वाढते आहे. परंतू हेच भात पिक सेंद्रिय पद्धतीने केले, तर जगभरात या भात पिकाला बाजारपेठ मिळेल. बीव्हीजी कृषी तंत्रज्ञानाच्या वापराने सेंद्रिय भात पिकाचे भरघोस उत्पादन घेता येणे शक्य आहे. त्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक व बीव्हीजी परिवार पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांनी केले.
पौड येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाद्यक्ष सुनिल चांदेरे, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सदस्य व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
गायकवाड म्हणाले, “बीव्हीजीच्या वतीने विषमुक्त शेती व कॅन्सर मुक्त अभियान देशभरात राबवले जात आहे. या अभियानाला जोड देण्यासाठी बीव्हीजीच्या वतीने सेंद्रिय शेतमाल निर्मितीसाठी विविध खते औषधांचे निर्माण केले जाते. याच सेंद्रिय कृषी निविष्ठांचा वापर करुन देशातील हजारो शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतमालाचे भरघोस उत्पादन मिळवले आहे. रासायनिक खते औषधांच्या वारेमाप वापरामुळे कॅन्सरचे रुग्ण वाढत आहे. कॅन्सर सारख्या भयावह आजारावर सुद्धा बीव्हीजीने औषध निर्माण केले आहे. अभिनेता संजय दत्त यांचा कॅन्सर बीव्हीजी औषधांनी बरा झाला आहे.”
गायकवाड पुढे म्हणाले, “शेती माणूस व पशुधन ही पृथ्वीवरची बलस्थाने आहेत. शेती व मानवी आरोग्याबरोबर बीव्हीजी पशुधन क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहे. बीव्हीजी औषधांनी भाकड गाई म्हशी दुभत्या होतात. त्याचबरोबर गाईं, म्हशींचे दुध देण्याचे प्रमाण वाढते.”
बीव्हीजी खते, औषधांचा वापर करुन सातारा जिल्ह्यातील कोट्याधीश झालेल्या जालिंदर सोळसकर यांनी बीव्हीजी औषधांचा अनुभव उपस्थित शेतकऱ्यांना सदोहरण समजावून सांगितला.