श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळासह बीव्हीजी लाईफ सायन्सेसचा पुढाकार
पुणे : रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे कर्करोगग्रस्त १८३ रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले. स्तन, गर्भाशय, फुफ्फुस,लिव्हर, ब्रेन ट्युमर, तोंडाचा, प्रोटेस्ट, रक्ताचा कर्करोग याविषयी पुर्नतपासणी करुन आयुर्वेदिक औषधोपचार देत दैनंदिन जीवनशैली कशी असावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत बीव्हीजी लाईफ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात मोफत कर्करोग तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सद्गुरु ग्रुपचे यशवंत कुलकर्णी, ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग सहकारी बँकेचे संचालक सुनील जाधव, राजेंद्र पायमोडे, राहुल चव्हाण, बीव्हीजी लाईफ सायन्सेसच्या डॉ.अर्चना शिंदे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, विशाल केदारी, अमोल चव्हाण, अंकुश रासने, तुषार रायकर, राजाभाऊ घोडके, सुभाष सूर्यवंशी आदी उपस्थित होते. डॉ. गौरव पाठारे, डॉ. मानसी माळवणकर, सुधाकर गर्डी यांनी शिबीराकरिता सहाय्य केले. शिबीरात २३ प्रकारच्या रक्ततपासण्या करण्यात आल्या.
डॉ. अर्चना शिंदे म्हणाल्या, कर्करोग हे जगभरातील मृत्यूंचे कारण आहे. सन २०२० मध्ये सुमारे १० दशलक्ष मृत्यु किंवा सहा मृत्युंपैकी एक मृत्यू हा कर्करोगामुळे झाला आहे. अशा रुग्णांकरिता बीव्हीजी लाईफ सायन्सेसने एक औषध तयार केले असून त्याचे मोफत वाटप या शिबीरात करण्यात येत आहे. तसेच आपण दैनंदिन कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन देखील आम्ही करीत आहोत.
महेश सूर्यवंशी म्हणाले, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांच्या सहकार्याने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पुढील टप्प्यात बीव्हीजी च्या सहकार्याने पुढील औषधोपचार देखील करण्यात येईल. ट्रस्ट जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत पुणे आणि परिसरातील तब्बल १८५ रुग्णालयांसोबत संलग्नपणे काम करीत आहे. रुग्णांना मोफत औषधे व शस्त्रक्रिया करुन देण्याचा प्रयत्न ट्रस्टतर्फे केला जातो. मागील वर्षी ४१ हजार रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. दर महिन्यातून एकदा असे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत असून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. याकरिता ट्रस्टच्या गणपती भवन कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.