पुणे : कात्रज कोंढवा रस्त्यावर रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार मुली बुडाल्याची घटना आज सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये एका मुलीचा मृत्यू झाला असून तिघीना वाचविण्यात यश आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलिसांनी घटनास्थळी धावा घेतली. या घटनेमधून पालिकेच्या पथ विभागाचा आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणासमोर आला आहे.ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी गेली ३ वर्षांपासून हे खड्डे खोदून ठेवले असून वेळोवेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी यासंदर्भात ओरड करूनही महापालिकेच्या पथ विभागाला आणि मुजोर ठेकेदाराला जाग आली नाही.याठिकाणी ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी रस्त्याच्या कडेला खड्डा खोदण्यात आलेला आहे. याठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास या सर्वजणी याठिकाणी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.
कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार,मुस्कान देवा शीलावत (वय १६) असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. तर, जणूबाई रमेश शिलावत (वय १६), तेजल जगदीश शीलावट (वय १२)सरगम जगदीश सिलावत (वय १५), यांना वाचवण्यात यश आले आहे. शिलावत हे हे बांजरा समाजाचे असून मागील ४ महिन्यापासून कोंढवा परिसरात राहण्यासाठी आले आहेत. चाकू- सुरी अशा घरातील वापराच्या वस्तूंना धार लावणे आणि चादर विक्री अशी कामे करुन त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
मुस्कानची चप्पल पाण्यामध्ये पडली. त्यामुळे ती चप्पल काढण्यासाठी पाण्यात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागली. त्यावेळी तिला वाचवण्यासाठी सरगम, जणूबाई, तेजल या मुली पाण्यामध्ये उतरल्या. मात्र त्या देखील एकपाठोपाठ बुडू लागल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या १० वर्षाच्या मुलीने तिच्या नातेवाईकांना धावत जाऊन याबाबत माहिती दिली. त्यावेळी त्यांच्या पालातील जगदीश छगन शिलावत व रमेश शिलावत यांनी घटनास्थळी धाव घेतली. सरगम, जणूबाई, तेजल या तीन मुलींना त्यांनी बाहेर काढले. त्यांनतर चौथी मुलगी मुस्कान हिचा शोध घेऊन तिला देखील बाहेर काढण्यात आले. परंतु तिची प्रकृती खूप चिंताजनक होती. तिला नजीकच्या पोटे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मुस्कान हिची तपासणी तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सोनावणे यांनी सांगितले.