पारनेरमधील बसस्थानकासमोर राहुल झावरे यांच्यावर10-12 जणांनी केला प्राणघातक हल्ला
अहमदनगर-लोकसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी विजय मिळवणारे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांचे पीए राहुल झावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. राहुल झावरे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पारनेरमधील बसस्थानकासमोर राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. 10-12 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या कारची तोडफोड करून त्यांना मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या राहुल झावरे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नीलेश लंके हेही लवकरच राहुल यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत.पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू
या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या या हल्ल्याचे नेमके कारण समोर आलेले नाही. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे. तसेच पारनेर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चुरशीच्या लढतीत नीलेश लंकेचा विजय
दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटात असलेले नीलेश लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने ते बरेच चर्चेत आले होते. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र शरद पवार गटात आल्यावर त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आला आणि अमहदनगरमधून त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत लंके यांनी महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा पराभव केला होता.