पुणे, दि. ५ : शिरूर तालुक्यातील गोलेगाव रोड, शिरूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या वसतिगृहात बाहेरगावाकडील परंतु शिरूर परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग, अनाथ, दिव्यांग असलेल्या विद्यार्थींनींना प्रवेश देण्यात येणार असून त्यांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी व शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य आदी सुविधा पुरविण्यात येतील.
अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, विद्यार्थ्याच्या व त्याच्या वडिलांच्या आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला, रेशन कार्डची छायांकित प्रत, बोनाफाईड प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
इच्छुक विद्यार्थींनी व पालकांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, गोलेगाव रोड, शिरूर ता. शिरूर येथे संपर्क साधून प्रवेश अर्ज घेऊन परिपूर्ण भरून द्यावेत, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती ए.आर.रणदिवे यांनी केले आहे.