महाबळेश्वर :बुकिंग करताना अनधिकृत बांधकामे असलेल्या हॉटेल मध्ये बुकिंग करू नका,असा स्पष्ट इशारा देऊनही संबंधित हॉटेल्समध्ये ऐन पर्यटन हंगामात बुकिंग केलेल्या महाबळेश्वर व पाचगणी येथील हॉटेल्सवर झालेल्या कारवायांमुळे संबंधित हॉटेलच्या रूममध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांना आता मनस्ताप, त्रास सहन करावा लागला या पर्यटकांना मुलाबाळांसह रस्त्यावर उभे राहून दुसऱ्या हॉटेलवर पर्यायी व्यवस्था पाहण्याची वेळ आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अशा पद्धतीने कारवाया करताना संबंधित हॉटेल व्यावसायिकांना किमान मुदत गेल्या 3 वर्षात वारंवार दिली, ऑनलाइन बुकिंग घेणाऱ्यांना देखील इशारा दिला मात्र तो न जुमानता राजकिय आसरा घेत धंदा थाटात सुरू ठेवलेल्या हॉटेल्सना जोरदार दणका प्रशासनाने दिला त्यांचे कौतुक एकीकडे होत आहे तर दुसरीकडे पर्यटकांची आबाळ होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्राची निसर्गरम्य थंड हवेची ठिकाणे असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी या पर्यटनस्थळी उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. त्यामुळे सर्वच छोटे- मोठे लॉजिंग, रिसॉर्ट्स खचाखच भरली आहेत. अशातच पाचगणी येथील हॉटेल द फर्न रिसॉर्टवर जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत ते सील बंद केले. त्यानंतर अग्रवाल कुटुंबीयांचे एमपीजी क्लब या महाबळेश्वरमधील आलिशान हॉटेलला देखील टाळे टोकून सील करण्यात आले. ही कारवाई करताना केवळ एक दिवस आधी व्यवस्थापनास नोटीस दिल्याची माहिती मिळत असली, तरी रिसॉर्ट वा हॉटेल्सचे एक- दोन महिन्यांपूर्वीच दोन ते तीन दिवसांसाठी आगाऊ आरक्षित केलेल्या पर्यटकांना अचानक जिल्हा प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे साहित्य व मुलाबाळांना घेऊन अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली. हॉटेल्स, रिसॉर्ट्सवर अशा कारवाया करताना हॉटेल व्यवस्थापनास पुरेसा अवधी दिला नाही अशी ओरड करत पर्यटकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. पर्यायाने महाबळेश्वर, पाचगणी पर्यटस्थळाची नावे खराब होणार नाही. त्यामुळे या सर्वच गोष्टींचा जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी बेकायदेशीर बांधकामांना पाठींबा देत करण्यात येते आहे.
तसेच या आस्थापनावरती काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या उदरनिर्वाह व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन त्यांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशी शहरातून चर्चा सुरू करण्यातआली. वास्तविक आजतागायत बेकायदेशीर व्यवसाय कुणाच्या पाठिंब्यामुळे सुरू होता? असा सवालही करण्यात येत आहे.
कायद्यांचे पालन करून व्यवसायाला प्रारंभ केलेले लोक मात्र या कारवाईने समाधानी आहेत, बेकायदेशीर बांधकामे करणारे आणि त्यांना पाठिंबा देणारे यांच्यामुळे महाबळेश्वर च्या लौकिकाला, सौंदर्याला, निसर्गाला बाधा पोहोचते आहे.
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्सा महाबळेश्वर तालुक्यात विनापरवाना अनाधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहेत. आजमितीला सुमारे 120 बांधकामे अनधिकृत आहेत. या अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले होते. त्यानुसार महसुल विभाग, पोलीस, ग्रामविकास विभाग आणि नगरपालिका प्रशासनाने अत्यंत गुप्तता पाळून 10 मार्च रोजी 6पहाटे मेटगुताड, गुरेघर येथील अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली.यापूर्वी सुरू करण्यात आलेली कारवाई मध्यंतरी थांबली होती. ती पुन्हा सुरू झाली नंतर पुन्हा थांबली होती.