पुणे:
स्वतःला धार्मिक गुरू म्हणवणारे भोंदू बाबा कालीचरण यांनी आपल्या माता भगिनींना केवळ उपभोग्य वस्तू असे उद्देशून तमाम महिलांचा अपमान केला आहे. जगातील तमाम सुंदर महिलांचा उपभोग घ्या” हे या भोंदू बाबाचे वक्तव्य राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात होणे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असा विकृतपणा खपवून घेतला जात नाही. म्हणूनच या याचा धिक्कार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन पुण्यात शुक्रवारी करण्यात आले.यावेळी “पुरोगामी महाराष्ट्र हवा, कालीचरणला पळवून लावा”, “समाजाला धोका, कालीचरणला ठोका” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अभिनव कला महाविद्यालय चौक, टिळक रस्ता येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात किशोर कांबळे, गणेश नलावडे, सारिका पारेख, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, तनया साळुंके, पायल चव्हाण, श्रधा जाधव, ऋतुजा देशमुख, मनीषा भोसले, दीपक जगताप, नितीन जाधव, ज्योतीताई सूर्यवंशी आदि पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होते.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, समाजामध्ये महिलांना आदराचे स्थान असताना देखील, त्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य कालीचरण या भोंदू बाबाने केले असून त्यांचे वक्तव्य सर्व महिलांचा अपमान करणारे आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्य बाबत जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

