मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामे द्यावेत – संभाजी ब्रिगेडची मागणी
संभाजी ब्रिगेड तीन जून पासून राज्यात आंदोलन करणार
पिंपरी, पुणे (दि.३० मे २०२४) लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकमशाही अशी होती. या निवडणुकित संभाजी ब्रिगेडने अपेक्षेशिवाय काम केले. परंतु महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत किमान पंचवीस जागा संभाजी ब्रिगेड मागणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन संभाजी ब्रिगेडने राज्यात सर्व जागांवर महाविकास आघाडी बरोबर प्रचार व प्रसार केला त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला किमान ३५ जागांवर विजय मिळेल. राज्य सरकार निष्क्रिय असून केंद्र सरकारच राज्य सरकार चालवीत आहे. पुणे औद्योगिक परिसरासह राज्यातील उद्योग गुजरातला नेले जात आहेत हे भाजपा व आरएसएस चे षडयंत्र आहे. यातून राज्यातील बेरोजगारीत वाढ होणार आहे. त्याचा परिणाम विदर्भ, मराठवाड्यात जास्त प्रमाणात जाणवणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उद्योग मंत्री व पालकमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी ही मागणी ॲड. आखरे यांनी केली.
संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्यकारणीची बैठक गुरुवारी (दि. ३०) चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे बोलत होते. यावेळी प्रदेश सहसंघटक मनोज गायकवाड, संघटन सचिव डॉ. संदीप कडलग, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी, महासचिव सौरभ खेडेकर, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत आदींसह राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.