विशाल अग्रवालांचे तावरेंना फोन वर फोन
पुणे- कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याने बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याने यासंदर्भात दोन डॉक्टरांसह तेथील शिपायाला अटक झाली. तर त्यांना 30 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याच डॉ. अजय तावरेंना ससून चे प्रमुख म्हणजे डीन करा असा आग्रह आमदार सुनील टिंगरे यांनी सातत्याने चालविला होता हे सांगणारे एक पत्र व्हायरल झाल्याने टिंगरे यांचा पाय आणखी खोलात रुतत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पुणे कार अपघात प्रकरणात सामोरे आलेल्या याच डॉ. अजय तावरेंसाठी ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती केली जावी, अशा मागणीचे शिफारस पत्र राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून 2023 मध्ये देण्यात आले होते. तर या शिफारस पत्रावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील मंजुरी दिल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सुनील टिंगरेंचे पत्र समाजमाध्यमावर व्हायरल झाले. त्यामुळे पुणे पोर्शे कार अपघात व डॉ. तावरेचा सहभाग अन् आमदार सुनील टिंगरे यांचे व्हायरल झालेले पत्र यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर विरोधकांना हा मुद्दाच मिळाला आहे.
ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे याने विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी चांगलाच भ्रष्ट कारभार केल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी दुसरेच सॅम्पल घेऊन ते तपासल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. अल्पवयीन आरोपीचा बाप विशाल अग्रवाल याने वारंवार डॉ. तावरेला फोन करून हे सर्व करायला लावले होते.
परिणामी, पुणे अपघात प्रकरणात अनेकांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासामध्ये डॉ. श्रीहरी होळकरने हे कृत्य डॉ. अजय तावरेच्या सांगण्यावरून केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याने रक्ताचे नमुने बदलले होते. पुणे पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरातून त्याला अटक केली होती. आज त्याला न्यायालयात हजर केले असता दोन्ही डॉक्टरांसह एका शिपायास 30 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून डॉ. अजय तावरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. 29 डिसेंबर 2023 रोजी अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजित पवारांच्या गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते. तर हसन मुश्रीफ यांनीही तावरे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते, असा आरोप देखील आमदार धंगेकर यांनी केला आहे.