पुणे – दिनांक २४ मे- डेक्कन जिमखाना क्लबने पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने (पीडीटीटीए) आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय सांघिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत यजमान डेक्कन जिमखाना क्लब बरोबरच पीवायसी जिमखाना, शारदा स्पोर्ट्स सेंटर इत्यादी संघांनी विजयी घोडदौड कायम राखली.
डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सतरा वर्षाखालील गटात डेक्कन जिमखाना ‘अ’ संघाने व्हायब्रंट अकादमी ‘अ’ संघाचा ३-० असा पराभव केला. त्यावेळी विजयी संघाकडून हिमांशू पटवर्धन, सारंग गवळी व सर्वेश जोशी यांनी शानदार कामगिरी केली. याच गटात पीवायसी ‘क’ संघाने चॅम्पियन्स ‘अ’ संघाचा ३-२ असा पराभव केला. त्याचे श्रेय विहान राऊत, अनुज फुलसुंदर व अली कागदी यांच्या खेळास द्यावे लागेल. पीवायसी ‘ब’ संघाने हिराबाग ‘अ’ संघावर ३-० अशी मात केली त्यावेळी त्यांच्याकडून आद्य गवात्रे, शुभम देशपांडे व स्वरूप पडळकर हे खेळाडू चमकले.
खुल्या गटातही पीवायसी व डेक्कन जिमखाना यांनी आव्हान राखले.पीवायसी ‘ई’ संघाने हिराबाग संघाला ३-० असे हरविले. डेक्कन जिमखानाच्या ‘जे’ संघाने डेक्कन जिमखानाच्या ‘पी’ संघाचा ३-० असा पराभव केला तर त्यांच्या ‘क’ संघाने पीवायसी ‘ई’ संघाचा ३-० याच फरकाने पराभव केला. त्यावेळी विजयी संघाकडून आदित्य गर्दे, अमित ढेकणे व सुयश कुंटे यांचा खेळ उल्लेखनीय झाला. शारदा स्पोर्ट्स सेंटर ‘अ’ संघाने डेक्कन जिमखानाच्या ‘ड’ संघावर ३-० असा विजय मिळविला. विभागीय क्रीडा केंद्र संघाने फोनिक्स ‘ब’ संघाला ३-० असे पराभूत केले.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास श्रीकांत अंतुरकर, श्रीराम कोनकर, गिरीश इनामदार, प्रकाश तुळपुळे, स्मिता बोडस श्रुती परांजपे आशिष बोडस, आनंद काळे हे उपस्थित होते.