पुणे, दि. २४ : खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील बी.सी.ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
इयता ८ वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, खुला प्रवर्ग, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थीनींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधिन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे.
वसतिगृहाची प्रवेश क्षमता कमाल ७५ आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थीनींना मोफत निवास, भोजन, स्टेशनरी साहित्य, अंथरुण- पांघरुण व दरमहा ५०० रूपये निर्वाह भत्ता व स्वच्छता प्रसाधनासाठी प्रत्येकी १०० रूपये देण्यात येतात. वसतिगृहामध्ये स्वतंत्र संगणक कक्ष, अद्ययावत ग्रंथालयाची सुविधा आहे.
२०२४-२५ या वर्षात सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थीनींचे वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज वाटप सूरू आहे. तरी इच्छुकांनी बी.सी.ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, राजगुरूनगर, ता. खेड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधून वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.