पोलिसांनी केली होती 8 दिवसांच्या कोठडीची मागणी मिळाली 3 दिवसांची
पुणे-पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीचे वडील तथा सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह नितेश शेवानी व जयेश गावकरे या 2 अन्य आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री अल्पवयीन आरोपीने 2 तरुण अभियंत्यांना उडवले होते. त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. पण त्यानंतर अवघ्या 15 तासांतच त्याला जामीन मिळाला होता. या प्रकरणी सोशल मीडियात टीकेची झोड उठल्यानंतर पोलिसांनी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली होती. त्यानंतर त्यांना या प्रकरणातील इतर आरोपींसोबत बुधवारी सत्र न्यायाधीश एस पी पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत कोर्टाने त्यांना 24 मेपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले.
तत्पूर्वी सरकारी वकील विद्या विभुते यांनी जोरदार युक्तिवाद केला. आरोपी अल्पवयीन मुलगा हा 2 बारमध्ये दारू पिण्यास गेला होता. ब्लॅक बारमध्ये केवळ सदस्यांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे तिथे आरोपीचे ओळखपत्र पहिले गेले का? त्याला आणि त्याच्या मित्रांना बारमध्ये कसा प्रवेश दिला? या आरोपींचा एकत्रित तपास करणे आहे, असे त्या कोर्टाला म्हणाल्या. आरोपींनी बिलाचे जे पैसे दिले त्याचाही तपास करणे आवश्यक आहे. आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुलास पार्टी आणि पबमध्ये जाण्यास अल्पवयीन असूनही परवानगी दिली. वाहन परवाना नसताना विना क्रमांकाची आलिशान कार त्यास दिली गेली. गुन्हा दाखल झाल्यावर त्यांच्याशी पोलिसांनी संपर्क केल्यावर त्यांनी पुण्यात असताना शिर्डीला असल्याचे पोलिसांना खोटे सांगितले, अशी बाबही त्यांनी यावेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
पुण्यातून फरार झाल्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे आढळून आले. त्यांनी आपला मोबाइल कुठे तरी लपवून ठेवला आहे. त्यामुळे गुन्हा झाल्यावर त्यांनी कोणाला संपर्क केला हे समजू शकले नाही. त्यांच्याकडे केवळ साधा फोन मिळून आला आहे. पब मध्ये जाण्यास किती पैसे त्यांनी मुलास दिले चौकशी करणे आहे. महागडी पॉर्श कार विना क्रमांक कशी वापरली तपास करणे आहे. गाडीत चालक असताना विशाल अग्रवाल यांनी आपल्या मुलास ती चालवण्यास दिली. गाडीचे रजिस्ट्रेशन झाले नसताना अल्पवयीन मुलास वाहन चालविण्यास देऊन दुसऱ्याचे जीवास धोका निर्माण करण्यात आला आहे, असेही सरकारी वकील यावेळी म्हणाल्या.
पोलिस निरीक्षक गणेश माने म्हणाले, आरोपींनी आरोपींनी सहकार्य केले नाही. पोलिसांना चकवा देत ते संभाजीनगर येथे गेले. त्यांनी मूळ मोबाईल स्वतःजवळ ठेवला नाही त्याचा उद्देश काय आहे. फरार काळात त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.पोर्शे गाडी रजिस्टर न करता त्यांनी पुण्यात फिरवली याबाबत वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो. वेगवेगळ्या मुद्द्यावर आणि शहरात तपास करणे आहे. त्यामुळे आरोपींची पोलिसांना 8 दिवसांची कोठडी दिली जावी, असे ते म्हणाले. पण न्यायालयाने 8 ऐवजी 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.