कसबा संस्कार केंद्राचा ३९ वा वर्धापनदिन ;
पुणे : श्रुतीसागर आश्रम फुलगांव पुणे संचलित कसबा संस्कार केंद्राच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यंदाचा कसबा कार्य गौरव पुरस्कार मंगेश पोळ, विपुल खटावकर, जलजा शिरोळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक २६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती केंद्राचे प्रमुख संयोजक अनिल दिवाणजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला अनघा दिवाणजी, वसुधा वडके, पूर्वा ढोले, आर्या परदेशी, दिव्या राऊत यांसह मुरलीधर देशपांडे, संगिता ठकार, प्रीती नायकवडी, अपेक्षा राऊत, संदीप लचके हे उपस्थित राहणार आहेत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात कसबा गौरव पुरस्कार बालगिर्यारोहक पार्थ डांगे आणि बाल गौरव पुरस्कार जलतरणपटू लावण्या कर्डे हिला प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वरदा बापट, प्रा.संगीता मावळे, हेमंत रासने, योगेश समेळ, अॅड.प्रताप परदेशी, डॉ.मिलिंद भोई, शिरीष मोहिते, पीयुष शहा, संदीप लचके, सीमा सरदेशपांडे, कल्पना जाधव, प्रल्हाद गवळी आदींची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अनिल दिवाणजी म्हणाले, कसबा गौरव पुरस्काराचे मानकरी मंगेश पोळ हे आंतरराष्ट्रीय शांतता सल्लागार प्रेरक वक्ता युवा राजदूत असून त्यांना राष्ट्रपती सुवर्णपदक देखील मिळाले आहे. तर, विपुल खटावकर हे शिल्पकार असून त्यांच्या रुपाने खटावकर यांची तिसरी पिढी या क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच, जलजा शिरोळे ही आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असून अनेक मोहिमा तिने पूर्ण केल्या आहेत.
अनघा दिवाणजी म्हणाल्या, संस्थेतर्फे दरवर्षी उदयोन्मुख युवा वर्गाला प्रोत्साहन देण्याकरिता गौरविण्यात येते. यावर्षी देखील पुरस्कार वितरण समारंभानंतर विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आणि सुसंस्कारसंपन्न भावी पिढी निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे बालसंस्कार केंद्र चालविण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.