पुणे : सिक्युरिटी कंपनीच्या नावाने बँकेत बनावट खाते उघडून ग्राहकांकडून त्यामध्ये पैसे घेऊन एक कोटी 28 लाखांची कंपनीची व ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे . या प्रकरणी कंपनीच्या दोन एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी ग्राहकांना कंपनीची रिटनगॅरंटी देऊन फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत प्रॉफिट मार्ट सेक्युरिटीज प्रा. लि. कल्याणी नगर पुणे व नाशिक येथे घडला आहे.
याबाबत सुनिलकुमार सत्यकुमार सिंग (वय-39 रा. मगरपट्टा सिटी, कासाफेलीस, हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन रोहित सतीश बोडके (रा. शिवाजीनगर, नांदगाव, मनमाड, नाशिक), अनिल गोपीचंद चव्हाण (रा. वाघदारदी रोडी, मनमाड, नाशिक) यांच्यावर आयपीसी 420, 408, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित बोडके हा फिर्य़ादी यांच्या प्रॉफीट मार्ट सेक्युरिटीज प्रा. लि. या कंपनीमध्ये अधिकृत एजंट म्हणून नोकरीला होता. त्याने त्याचा साथीदार अनिल चव्हाण याच्यासोबत संगनमत करुन स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीच्या नावाने एचडीएफसी बँकेत बनावट खाते उघडले. आरोपींनी कंपनीच्या सेबी गाईडलाईन्सच्या सूचनांचे उल्लंघन केले.
कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडून कंपनीच्या नावाखाली अनेक ग्राहकांकडून 1 कोटी 28 लाख रुपये घेतले. आरोपींनी कंपनीची परवानगी न घेता ग्राहकांना फिर्यादी यांच्या कंपनीची रिटनगॅरंटी दिली. रोहित बोडके व अनिल चव्हाण यांनी फिर्यादी यांच्या कंपनीची व कंपनीच्या अनेक ग्राहकांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.