पुणे-पाउस आणि वारा यामुळे जाहिरातीचे होर्डिंग बँड पथकाच्या वाहनावर कोसळले. ही घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्ती येथील गुलमोहोर लॉन्स समोर शनिवारी (दि.18) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. होर्डिंग पडल्याने बँड पथकातील घोडा जखमी झाला. तर 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह तीनजण जखमी झाले असून ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती गंभीर आहे. पोलीस तपासात हे होर्डिंग अनधिकृत असल्याचे समोर आले असून पोलिसांनी जागा मालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अंमलदार अजिंक्य दिपक जोजारे (वय-29) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन जागा मालक शरद ज्ञानेश्वर कामठे (रा. लोणी काळभोर), सम्राट ग्रुपचे संजय संभाजी नवले (रा. खराडी), बाळासाहेब बबन शिंदे (रा. डेक्कन, पुणे) यांच्यावर आयपीसी 338, 337, 429, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागा मालक शरद कामठे यांनी सम्राट ग्रुपचे संजय नवले व बाळासाहेब शिंदे यांना त्यांच्या जागेमध्ये होर्डिंग लावण्यास परवानगी दिली. आरोपींनी 40 बाय 40 रुंदीचे जाहिरातीसाठी लोखंडी सांगाड्याचे होर्डिंग उभारले. मात्र, होर्डिंग उभा करत असताना सक्षम प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच होर्डिंग बसवण्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिट न करता नागरिकांच्या जिवीतास व मालमत्तेस धोका होऊ शकतो हे माहिती असताना होर्डिंग उभारले. कमकुवत कन्स्ट्रक्शन करुन जाहिरात होर्डिंग उभा केले.
शनिवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळले. त्याखाली मंगेश लक्ष्मण लोंढे (वय-35 रा. गंजपेठ, गुरुवार पेठ, पुणे), अक्षय सुरेश कोरवी (वय-7 रा. अप्पर डेपो, बिबवेवाडी, पुणे), भारत शंकर साबळे (वय-70 रा. ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे) हे जखमी झाले आहेत. यापैकी भारत साबळे यांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत एक घोडा देखील गंभीर जखमी झाला असून महिंद्रा पिकअप जीप, एक स्कूटर होर्डिंग खाली दबल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.