देवगावकर फाउंडेशन तर्फे ‘ये शाम मस्तानी’ हिंदी गीतांचा कार्यक्रम सादर ; ‘स्मित फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेला मदत
पुणे : ‘ये शाम मस्तानी मदहोश किये जाये’…’कोरा कागज था ये मन मेरा लिख दिया नाम इसपे तेरा’… ‘सुनो सजना’ अशा एकाहून एक सुरेल गीत सादर करून गायक आणि वादकांनी सूर आणि संगीताच्या साथीने ये शाम मस्तानी हा कार्यक्रम रंगवला.
देवगावकर फाउंडेशन तर्फे जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या गाण्यांचा ‘ये शाम मस्तानी’ या कार्यक्रमाचे आयोजन मयूर कॉलनी मधील बालशिक्षण सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये गायक आणि वादकांनी अप्रतिम कलेचे सादरीकरण करून रसिकांचे मन जिंकले. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमृता देवगावकर आणि मंदार देवगावकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
अमृता देवगावकर म्हणाल्या, संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन केवळ मनोरंजन म्हणून नव्हे, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘स्मित फाउंडेशन’ या सेवाभावी संस्थेला मदत करण्यात येणार आहे. देवगावकर फाउंडेशन तर्फे यापूर्वी डॉ. रामचंद्र देखणे भावार्थ देखणे यांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
गायक जितेंद्र अभ्यंकर यांनी राजेश खन्ना यांच्या कटी पतंग या चित्रपटातील ‘ये शाम मस्तानी मदहोश किया जाय’ या गाण्याने कार्यक्रमाचे सुरुवात केले. त्यानंतर ‘कोरा कागज था ये मन मेरा’, ‘सुनो सजना’, ‘आये दिन बहार के’, ‘पिया तो से नैना लागे रे’, ‘हवा के साथ साथ’, ‘घटा के संग संग’, ‘बाहो मे चले आओ’ अशी एकाहून एक बहारदार गाणी सादर करून कलाकारांनी रसिकांना चित्रपट गीतांच्या सुवर्ण काळाची आठवण करून दिली.
जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले, संदीप उबाळे, स्वप्नजा लेले, अमान सय्यद, अपूर्व द्रविड, केदार मोरे या कलाकारांनी या कार्यक्रमांमध्ये आपल्या कलेचे सादरीकरण केले. स्नेहल भट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमापूर्वी स्मित फाउंडेशनच्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात आली.