पुणे – सालस ,सुस्वभावी , राजकारणात राहूनही राजकारणी न बनता, सर्वांना भाऊ भाऊ अशी प्रेमळ साद घालत आपल्या विनम्र वाणीने समाजकारण करत राहिलेल्या , कधीही खुर्चीसाठी वा फोटोसाठी न धावलेल्यापुण्याच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन(वय ५८ ) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सकाळीच त्यांच्या भावाचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाचा धक्का बसून त्यांचेही निधन झाले. भावा-बहिणीचे एकाच दिवशी निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रजनी रवींद्र त्रिभुवन यांच्या भावाचे बुधवारी सकाळी निधन झाले होते. त्यामुळे त्या आपल्या कुटुंबियांसमवेत भावाच्या अंत्यदर्शनाला गेल्या होत्या. भाऊ अचानक गेल्याचा धक्का बसल्याने त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यांचा त्रास वाढल्याने त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले.माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या कारकिर्दीत पुण्यात महिला महापौर करण्यास प्राधान्य देण्यात आले. यात कमल व्यवहारे, वंदना चव्हाण, दीप्ती चवधरी, वत्सला आंदेकर, रजनी त्रिभुवन आदी महिला नगरसेविका यांना महापौर पदी काम करण्याची संधी मिळाली. रजनी त्रिभुवन या 2004 ते 2006 दरम्यान त्या पुणे महानगरपालिकेच्या महापौर होत्या. थेट झोपडपट्टीतून येऊन महापौर पदावर बसणाऱ्या त्या महिला महापौर होत्या.
रजनी त्रिभुवन यांनी आपल्या महापौरपदाच्या कार्यकाळात वेगवेगळे निर्णय घेत शहरातील समस्या सोडवल्या. त्यांची दूरदृष्टी, हजरजबाबीपणा यामुळे शहरातील अनेक प्रश्न आग्रहाने मार्गी लागले होते. पुणे शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी शहरातील माजी महापौरांची एक संघटनाही स्थापन केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा सक्रिय प्रचार करण्यात देखील त्या अग्रेसर होत्या.राजकारणात रजनी त्रिभुवन यांच्यासारख्या सुगुणी महिला दिसणे सोज्वळ राजकारणाचे लक्षण मानले जाईल ..