पुणे दि.१३: लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेची निवडणूक. हा उत्सव महाराष्ट्रासह देशभरात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडतो आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात आज मतदान आहे यानिमित्ताने, आज सकाळी १०:३० च्या सुमारास शिवाजीनगर येथील बूथ क्र. १९२ वर शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचे पवित्र कर्तव्य करावे असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी केले.
तसेच मतदारांनी घाबरून मतदानाला जाऊ नये, मतदानाचे प्रमाण कमी रहावे याहेतूने काही लोकांकडून दरवेळेस पैसे वाटप करण्याच्या तक्रारी करून गोंधळ निर्माण केला जातो. मात्र नागरिकांनी अशा गोष्टींना न घाबरता मतदान केले पाहिजे. आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आणि बलशाली भारत बनविण्यासाठी १०० टक्के मतदान लोकसभा आणि विधानसभेला होणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
सर्वांनाच समान नियम असावा
मतदानाचा हक्क बाजावल्यानंतर त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची स्वतःचे छायाचित्र घेण्याची इच्छा असते. मात्र मतदानाच्या ठिकाणी तसेच मतदान केंद्रावर त्यास मनाई करण्यात आली आहे. असे असले तरी अन्य ठिकाणावर अनेक नेत्यांचे, नागरिकांचे मतदान करतानाचे व्हिडीओ आणि छायाचित्र दिसतात. बारामती लोकसभा निवडणुकीत एका नेत्याकडून मतदानाच्या ठिकाणी तर मुलीसोबत छायाचित्र घेतल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर नागरिकांनी छायाचित्र घ्यावीत का न घ्यावीत याबाबत निवडणूक आयोगाने सर्वांनाच समान नियम ठेवावा अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.