वारजे भागात आदित्य गार्डन सोसायटीतील जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना 7 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करुन जीव रक्षक आणि स्विमींग टँकची देखभाल करणाऱ्या कंपनीच्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
शिवांश श्याम पठाडे (वय 7) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी जीव रक्षक सुजीत कुमार अंजनीकुमार चौधरी (वय-30 रा. सुरारवाडी, पाषाण, पुणे), स्विमींग टँकची देखभाल करणाऱ्या कंपनीचा चालक बाबु उर्फ विक्रम धाकु बावधने (वय-36 रा. शिवणे, पुणे) यांच्यावर आयपीसी 304(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत श्याम वामनराव पठाडे (वय-46 रा. आदित्य गार्डन सिटी, वारजे माळवाडी, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाडे कुटुंब मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आहे. शिवांशचे आई- वडील खासगी कंपनीत नोकरी करतात. या सोसायटीतील लहान मुलांसाठी असलेल्या जलतरण तलावात शिवांशला त्याच्या आई-वडिलांनी उतरविले. त्यावेळी स्विमींग टँकच्या वेळेत प्रशिक्षीत जीव रक्षक म्हणून सुजीतकुमार चौधरी याने पोहणाऱ्या सदस्यांकडे व लहान मुलांकडे लक्ष देण्याची जबाबदारी होती. मात्र, त्याने कर्तव्यात हलगर्जी व निष्काळजीपणे दुर्लक्ष केले.
त्यामुळे फिर्यादी यांच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.लाईफ गार्ड याच्यावर देखरेख व नियंत्रण करण्याची जबाबदारी असताना हयगय केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ओलेकर(७५०६०७२६११ ) करीत आहेत.