पुणे-जागतिक कारागृह बुध्दिबळ स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या लढतीत येरवडा मध्यवर्ती कारागृह संघाने खंडातून प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळवून दिल्याने येरवडा कारागृहातील आठ कैद्यांना कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी आपल्या विशेष अधिकारातून ९० दिवसांच्या शिक्षेची माफी दिली आहे.
राज्यातील कारागृहात विविध गुन्ह्यातील बंदी शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या मनावर चांगले संस्कार व्हावे, तसेच कारागृहातून बंदी बाहेर पडल्यानंतर त्यांना उपयोगी पडणारी सामाजिक पुनर्वसनाची महत्त्वाची मुल्ये त्यांच्यामध्ये निर्माण व्हावीत, या उद्देशाने महाराष्ट्र कारागृह विभाग बंद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनाच्या उद्दिष्ट सफलतेसाठी प्रयत्नशील आहे. कारागृहात बंद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. विविधतापूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून बंद्यांना सामाजिक जीवनाच्या अधिक चांगल्या व उपयुक्त मार्गासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. बंदी कारगृहातून सुटल्यानंतर समाजाने त्यांना सन्मानाने स्वीकारावे हे उद्दिष्ट सफल होवून कारागृहाची प्रतिमा उंचावण्यास मदत व्हावी व त्यायोगे कारागृहाविषयी समाजात चांगला संदेश जावा, तसेच बंद्यांमधील सुप्त गुणांना योग्य तो वाव मिळावा या उदात्त हेतूने महाराष्ट्र कारागृह विभाग शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक, क्रीडाविषयक अशा प्रकारचे विविध उपक्रम कारागृहातील बंदीबांधवांसाठी राबविण्याबाबत नेहमीच प्रयत्नशील आहे.
अशाच उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र कारागृह विभाग व इंडियन ऑईल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने परिवर्तन प्रिझन टु प्राईड या उपक्रमाअंतर्गत दि. ११ ते १६ ऑक्टोंबर २०२३ दरम्यान जागतिक कारागृह ऑनलाईन बुध्दिबळ सपर्धा पार पडल्या. सदर स्पर्धेत खुल्या गटात ५० देशातील ८० संघांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक फेऱ्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी करत येरवडा मध्यवर्ती कारागृह संघाने आशिया खंडातून प्रथम क्रमांक पटकाविला व अंतिम फेरीत प्रवेश मिळवून येरवडा मध्यवर्ती कारागृह संघाने अत्यंत चुरशीच्या लढतीत एल साल्वसोर या देशाच्या ब संघाचा पराभव करुन प्रथमच तृतिय जागतिक कारागृह ऑनलाईन बुध्दिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करुन मानाचा शिरपेच कारागृह विभागास प्राप्त करुन दिला.
सदर स्पर्धेत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील आठ शिक्षा बंद्यांनी जागतिक कारागृह बुध्दिबळ स्पर्धेत सहभाग नोंदवून जागतिक पातळीवर सुवर्ण पदक मिळवत महाराष्ट्र कारागृह प्रशासनास लौकिक मिळवून दिलेला आहे. तसेच भारतीय कारागृह इतिहासात अत्यंत गौरवास्पद अशी कामगिरी केलेली आहे.
अशा या उत्कृष्ट कामगिरीमुळे येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील आठ शिक्षा बंद्यांना कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता, यांनी त्यांचे विशेष अधिकारात प्रत्येकी ९० दिवस विशेष माफी दिलेली आहे.सदरच्या विशेष माफी सवलतीमुळे काही बंदी लवकर मुक्त होवून ते आपल्या परिवारात जाण्यास मदत होते. विशेष माफी मिळत असल्याने कारागृहातील वैविध्यपूर्ण उपक्रमात भाग घेण्यासाठी बंदी प्रेरीत होत आहेत. अशा प्रेरणादायी उपक्रमांमुळे कारागृहातील बंद्यांना तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर निश्चितच चांगले जीवन जगण्याची संधी मिळते.