पुणे,दि.१२ :- विशेष निवडणूक निरिक्षक धर्मेंद्र गंगवार आणि विशेष पोलिस निरिक्षक एन.के.मिश्रा यांनी शिरुर लोकसभा मतदारसंघांतर्गत आंबेगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन अवसरी येथील मतदान साहित्य वितरण केंद्राला भेट देऊन तेथील नियोजनाची पाहणी केली.
निवडणूक निरिक्षकांनी यावेळी विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दिव्यांग मतदान केंद्र पथकांशी बोलताना त्यांनी दिव्यांग अधिकारी-कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी दाखविलेली सकारात्मकता आणि आत्मविश्वास याची प्रशंसा केली. मतदान प्रक्रियेसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. पथकांना साहित्य वितरण करताना, निवडणूक प्रशासनाच्यावतीने तेथे करण्यात आलेल्या विविध सोयी-सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.
सहायक निवडणूक अधिकारी गोविंद शिंदे, अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी संजय नागटिळक, नायब तहसीलदार श्री सचिन वाघ, सहायक प्रमिला वाळुंज आदी यांनी यावेळी निवडणूक शाखेने केलेल्या तयारीची माहिती निरिक्षकांना दिली.