पुणे, दि. ११: जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या १३ मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरासाठी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
हे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये निर्गमित करण्यात आले असून याद्वारे सर्व वाणिज्यिक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस फोन, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर विद्युत उपकरणे तसेच चिन्हांचे प्रदर्शन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत.
पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी सकाळी ६ वाजेपासून मतदान संपेपर्यंत मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मतदारांव्यतिरिक्त प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतूद व भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ नुसार दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील, असेही डॉ. दिवसे यांनी कळविले आहे.
0000