नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात पुन्हा भाजपचे सरकार आले तर उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांना तुरुंगात डांबण्यात येईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिला. पंतप्रधान मोदी देशात एक देश एक नेता धोरण राबवत आहेत. त्यामुळे त्यांनी मला तुरुंगात डांबून आपल्या सर्व विरोधकांना असा संदेश दिला आहे, असे ते म्हणालेत.
दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी जामीन मिळाला. त्यानंतर शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात डांबण्याचा कट आखल्याचा इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात एक देश एक नेता धोरण राबवत आहेत. त्यांनी मला तुरुंगात टाकून देशातील सर्व विरोधकांना असा संदेश दिला आहे. ते मला व हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकू शकतात, तर 4 जून रोजी सत्ता आल्यानंतर ते देशातील कोणत्याही नेत्याला तुरुंगात डांबू शकतात.
भाजपने एका वर्षात आम आदमी पक्षाच्या 4 मोठ्या नेत्यांना तुरुंगात डांबले. पंतप्रधान मोदींनी आमच्या पक्षाला पूर्णतः नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. आता ते इतर पक्षांच्या बाबतीतही असेच करतील. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता आली तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, राजद नेते तेजस्वी यादव, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात गजाआड दिसतील, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना केंद्रातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत येण्याची ऑफर दिली होती. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची ही ऑफर स्पष्टपणे फेटाळली होती.
महाराष्ट्राचे एक दिग्गज नेते 40 वर्षांपासून फिरत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर ते खूप चिंतेत आहेत. त्यांनी एक विधान केले आहे जे मला वाटते की, त्यांनी अनेकांसोबत चर्चा करुन केले असेल. ते फार हताश व निराश झालेत. आता त्यांना वाटत आहे की, 4 जूननंतर राजकारणात टिकून राहायचे असेल तर छोट्या राजकीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची गरज आहे. याचा अर्थ असा की, जी नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे, त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा छातीठोकपणे अजित पवार व एकनाथ शिंदेंसोबत यावे. त्यांची मोठ्या अभिमानाने स्वप्ने साकार होतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.
उद्धव ठाकरे यांनी मोदींचा प्रस्ताव आपल्या शेलक्या टीकेद्वारे फेटाळला होता. तुम्हाला नेमके काय करायचे आहे ते ठऱवा. आजपर्यंत तुम्ही सर्वांना फोडलेत. शिवसेनाही फोडली. राष्ट्रवादी फोडली. तरीही तुम्ही मला व पवारांना डोळा मारत आहात. एकीकडे आम्हाला नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादी म्हणायचे आणि दुसरीकडे आजा मेरी गाडी बैठ जा म्हणायचे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.