…तुम्ही कफन चोर आहात…उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Date:

मुंबई दिनांक १ मे २०२४
कोरोना काळात विकसित राष्ट्रांचा लस घेण्यासाठी आपल्यावर दबाव होता. तो दबाव मोदींनी झुगारून दिला. पूर्वी तीस वर्षे भारताला लस मिळत नव्हती. जगात तीन ते चार देश लस तयार करू शकले त्यात भारत आहे. मोदींच्या नेतृत्वात ती तयार झाली. उद्धवजी ‘तुमको मिरची लगी तो मै क्या करू..’ त्या काळात तुम्ही खिचडी, कफन चोरी करत होता. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही..लोक मरत असताना उपाशी असताना घोटाळे करत होता. बॉडी बॅगचा घोटाळे करणारे तुम्ही कफन चोर आहात अश्या शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधले.
मुंबई भाजपच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आज ते बोलत होते. दादर येथील कामगार मैदानावर भव्य मेळावा पार पडला.

यावेळी महायुतीचे उत्तर मुंबईचे लोकसभा उमेदवार, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उत्तर-मध्य मुंबईचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम, ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा, विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजपा खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्याने मोठा इतिहास घडवला आहे. संपूर्ण देश पारतंत्र्यात असताना महाराष्ट्राच्या मराठी मातीतून एक हुंकार निर्माण झाला आणि आई जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. हिंदू पादशाही निर्माण करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. पुढच्या अनेक पिढ्यांच्या रक्तामध्ये स्वातंत्र्याचे बीजारोपण त्यांनी केले. महाराष्ट्राने शौर्य दिले. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महाराष्ट्राचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही. खऱ्या अर्थाने क्रांतीची ज्योत पेटवण्याचे काम या भूमीमध्ये झाले. महाराष्ट्र तयार होत असताना काँग्रेसकडून अनेक लोकांना हुतात्मा करण्यात आले. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले होते. ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्यावर येईल त्यावेळी माझं शिवसेना नावाचे दुकान मी बंद करून टाकीन आणि परवा त्यांच्या सुपुत्राची प्रेस कॉन्फरन्स मी पाहत होतो. ते हसत सांगत होते. उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार काँग्रेसच्या वर्षाताई आता मी तुझा मतदार आहे. तुझ्या पंजाचे बटन दाबून मी काँग्रेसला मतदान करेल. काय वाटलं असेल वंदनीय बाळासाहेब यांच्या आत्म्याला… खुर्ची करता हा ऱ्हास आपल्याला पाहायला मिळत आहे. एकीकडे बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांशी पूर्णपणे प्रतारणा करायची. बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असतील पण विचारांचे मालक एकनाथराव शिंदे आहेत. विचारांना जिवंत ठेवण्याचे, हिंदुत्व जिवंत ठेवण्याचे काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने केले आहे. भारताचे ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राने प्रगती केली. देशाच्या जीडीपीतील १५ टक्के जीडीपी महाराष्ट्रात तयार होतो. देशातील वस्तू उत्पादनामध्ये २० टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. निर्यातीमध्ये २२ टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. सर्वात जास्त परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येत आहे. या देशाला चालवण्याचे काम आर्थिक राजधानी म्हणून महाराष्ट्र आणि मुंबई करत आहे. महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला चालले या चुकीच्या गोष्टी सांगतात. महाराष्ट्रची ताकद उद्धव ठाकरे यांच्या चेला चपाट्यांना माहित नाही. महाराष्ट्राची क्षमता त्यांना माहित नाही म्हणून ते महाराष्ट्राचा अपमान करतात. ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार आले. त्याला मोदीजींचा आशीर्वाद होता. २०१५ ते २०१९ पर्यंत सातत्याने परकीय थेट गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम आम्ही केले. त्याच्या आधी देशात, राज्यातही काँग्रेसचे सरकार होते. गुंतवणूकीत महाराष्ट्र चौथ्या आणि पाचव्या, सातव्या क्रमांकावर होता. तो पहिल्या क्रमांकावर आणला. दोन वर्षात देशात आलेल्या गुंतवणुकी पैकी ४२ टक्के आणि ४९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आली. आमचं सरकार गेल्यानंतर आमच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस आणि पवार साहेबांसोबत तुम्ही सरकार केले. तुम्हाला खुर्ची बोलवत होती. तुम्हाला त्याठिकाणी तत्व, मूल्य, नव्हती. तुमचे केवळ एकच स्वप्न होते त्या खुर्चीवर मी कसा बसतो हेच.. त्या खुर्चीवर बसण्याकरता तुम्ही विचारांना तिलांजली दिली. पहिल्या क्रमांकवर असणारा महाराष्ट्र तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आला. गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र मागे गेला. त्याच्या पुढच्या वर्षी गुजरात पहिला क्रमांकावर आला आणि पुन्हा महाराष्ट्र मागे केला. तुम्ही महाराष्ट्रा बद्दल बोलता तर तुमच्या मनगटात धमक का नव्हती की, ज्या महाराष्ट्राला आम्ही पहिल्या क्रमांकावर आणले होते तो, तुमच्या राज्यामध्ये मागे गेला. तोंडाच्या वाफा काढून राज्य पुढे जात नसते. त्या ठिकाणी मनगटात जोर असावा लागतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यावर महाराष्ट्राला पुढे आणून पहिल्याच वर्षी महाराष्ट्र नंबर वनवर आणला. यावर्षी पुन्हा महाराष्ट्र नंबरवन आला आहे. गुजरात, कर्नाटक, दिल्ली एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. रडायचं नाही तर लढायच , लढणार आहोत लढत लढत पुढे जाऊ…. तुम्ही अडीच तीन वर्षे त्या ठिकाणी होतात तर आमची गुंतवणूक चालली म्हणून रडत राहिलात. ज्या राज्यांमध्ये सत्तारूढ पक्ष षडयंत्र करतो आणि जो सगळ्यात मोठा गुंतवणूकदार आहे त्यांच्या घरासमोर तुमचे पोलीस षड्यंत्र करून बॉम्ब ठेवतात. कोण तुमच्या राज्यात येईल. ज्या राज्यामध्ये शंभर कोटी रुपयांचे वसुलीचे रॅकेट चालते त्या राज्यांमध्ये कोण येणार आहे. ज्या राज्याचे मुख्यमंत्री अडीच वर्षात केवळ दोन वेळा मंत्रालयात जातात आणि फेसबुक लाईव्ह करतात आणि कोमट पाणी प्या म्हणतात त्या राज्यामध्ये कोण जाईल. तुमचे नेते माझं कुटुंब माझी जबाबदारी इतर सगळ्यांचे कुटुंब मोदींची जबाबदारी अशी तुमची निती होती. २५ वर्षे मुंबई महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली. आम्ही सोबत होतो पण राज्य तुमचे होते. वीस वर्षांमध्ये या मुंबईला तुम्ही काय दिले. सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये काय बदल केला? जो मराठी माणूस गिरणी कामगार दक्षिण मुंबईत राहत होता त्याला हद्दपार करण्याचे काम तुम्ही केले. ७० हजार कोटी बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये टाकले पण त्या मराठी माणसाला घर देण्याकरता तुम्हाला निर्णय घेता आला नाही. बंगलोर, हैदराबाद आयटी कॅपिटल झाले कारण राज्यातील काँग्रेस सरकार आणि त्यांना भ्रष्टाचार करायचा होता. मालपाणी मिळणारे काम त्यांना हातात घ्यायचे होते. त्यामुळे मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाले नाही. आयटी उद्योग परवडत नसल्यामुळे उद्योग मुंबई बाहेर गेले. पंतप्रधान मोदीजींचे सरकार आल्यानंतर स्टार्टअप पॉलिसी आणली. आता स्टार्टअप कॅपिटल महाराष्ट्र आहे. देशातील सर्वात जास्त रजिस्टर स्टार्टअप २० टक्के देशाचे स्टार्टअप एकट्या महाराष्ट्राच्या आहेत. देशाचे युनिकॉर्न २५ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. कारण आम्ही रडलो नाही लढलो. कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक, लोकल ट्रेन, मेट्रो, एसटीपी प्रकल्प यामध्ये तुमचा काय वाटा आहे. तुम्ही कुठून कुठून वाटा घेतला त्याबद्दल मी बोलत नाही. याचं उत्तर हे देवू शकत नाहीत. उत्तर देता आले नाही की, मावळे कावळे हे यांचे ठरले आहे त्याच्यापलीकडे जात नाहीत. आता हे अध्यक्ष आहेत की, गल्लीचे नेते आहेत अशी भाषा त्यांची झाली आहे. याद राखा इटका जवाब पत्थर से देना हम जानते है… संयम ठेवला आहे कारण आम्ही परिपक्व आहोत. ज्या दिवशी आपल्यावर येऊ त्या दिवशी काय ताकद आहे ते दाखवून देवू. मुंबई मोदींवर प्रेम करते. हे प्रकल्प मोदी नसते तर होऊ शकले नसते. झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प झाले नसते. या निवडणुकीच्या निमित्ताने विकसित भारत तयार करत आहोत. मुंबईत काँक्रीटचे रस्ते तयार झाले असून पन्नास वर्ष त्याकडे पाहण्याची गरज नाही. खड्डामुक्त मुंबई झाली आहे. मुंबईला कोणाचाही बाप महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची असेल. हे लबाड लांडगे निवडणूक आली की, कोल्हेकुई सुरू करतात. यांची डायलॉग बाजी त्यांचेच लोक ऐकत नाहीत. मोदीजींनी आपल्या शास्त्रज्ञांना संधी दिली आणि लस तयार करून घेतली ती लस मिळाली म्हणून आज १४० कोटी भारतीय जिवंत आहेत. तर यांना मिरची…. यांना लस म्हणजे लसूण वाटते. तुमच्या घोटाळ्यांची मालिका आम्ही काढणार आहोत. अभी तो शुरुवात हुई है आगे आगे देखिये होता है क्या.. आज या देशाला कणखर नेतृत्व हवे आहे. देशात गुंतवणुकीची संधी आहे. भारताकडे जग आकृष्ट होत आहे. भारतामध्ये महाराष्ट्र राज्य इन्वेस्टर फ्रेंडली आहे. तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाल्यानंतर भारताची इकॉनोमी फाईव्ह ट्रिलियन होईल. महाराष्ट्र वन ट्रिलियनची इकॉनॉमी आम्ही सोबत करू. एमएमआरचे रिजन वन ट्रिलियन करण्याची क्षमता आहे. डेटा सेंटर कॅपिटल तयार होत आहे. मुंबई महायुतीच्या पाठीशी उभी आहे. फेक नरेटिव्ह पराभूत होईल. मुंबईतील महायुतीचे सहा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, महाराष्ट्राच्या राज्य गीताच्या गायनाचे कार्यक्रम शक्ती केंद्रावर केले. १ हजार ७७ ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले. जय महाराष्ट्र म्हणून राजकारण करणारे मुंबईच्या कुठल्या चौकात किंवा गल्लीबोळात दिसले नाहीत. निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. भाजपा किंवा महायुतीकडून खालच्या स्तरावर प्रचार केला जात नाही. या निवडणुकीमध्ये काही गोष्टी आम्हाला नव्याने कळत आहेत. काही नेते बहुरूपी म्हणून सापडत आहेत. काही लोकांचे अर्ध्या तासात रंग बदलू लागले आहेत. पंतप्रधान मोदी भारतीय जनता पक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सत्यता न तपासता आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातील नंबर एकचे बहुरूपी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. त्यांची विधाने पाहिले असता मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घालवले. प्राण गेला तरी महाराष्ट्र हुकूमशाहीच्या हाती जाऊ देणार नाही असेही त्यांनी म्हटले. दुसरे बहुरूपी पत्रकार पोपटलाल म्हणत आहेत की, महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी काही आत्मे महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहे. माझा पक्ष आणि काँग्रेस सर्व मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला असेही म्हणत आहेत. आपल्यावर आरोप करणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची बहुरूपी गॅंग काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, कम्युनिस्ट यांच्याबरोबर आहेत. रोज नौटंकी चालू आहे. लढा संयुक्त महाराष्ट्राचा या पुस्तकात काँग्रेसच्या मुरारजी देसाई यांनी केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी या मुंबईमध्ये जर दोन मिनिटाला एक गोळी दिवसाला २७०० च्या वरती गोळ्या, नव अर्भक, नव विवाहिता, कामगारांचा मृत्यू, घरात जेवण करत बसलेल्या मृत्यू झाला. हे बलिदान आणि मृत्यू १०५ हुतात्म्यांचा खून काँग्रेसने केला. नराधन काँग्रेसने राज्यातील मराठी माणसाचा खून केला. उद्धवजी त्या काँग्रेसबरोबर तुम्ही हातमिळवणी केली. ज्या काँग्रेसच्या हाताला मराठी माणसाचा खून करून काँग्रेसच्या हाताला रक्त लागले त्याच्याशी हात मिळवणी उद्धव ठाकरे यांनी केली. माझा बहुरुपी उद्धवजींना प्रश्न आहे की, मातोश्रीमध्ये जाऊन आरशात बघाल तर तुमच्या हाताला मराठी माणसाच्या खुनाचे रक्त लागलेले दिसेल. मुंबईकर जनता चिडलेली आहे. मराठी माणूस दुःखी आहे. मुंबईवर आणि महाराष्ट्र प्रेम करणारा मराठी माणूस त्रागा व्यक्त करत आहे. मतासाठी तुम्ही रंग बदलले, बहुरूपी झालात महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे. तुम्हाला जय महाराष्ट्र करताना आत्मपरीक्षणाची विनंती करतो. तुमच्या हाताला लागलेल्या रक्तातून मुक्तता मिळवण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याची विनंती करतो असेही
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...