७५ देवदासींसोबत आपुलकीची भाऊबीज व धान्य कीटची ओवाळणी भेट
पुणे : संवेदनशीलता माणसाला ख-या अर्थाने परमेश्वराच्या जवळ नते. धर्म, दया आणि संवेदनशीलता यावर आपण समाजासाठी खूप काही करु शकतो. प्रत्येकामध्ये संवेदनशीलता असते, मात्र ती जागृत करणे आवश्यक आहे. संवेदनशीलता ही माणसाला समाजाविषयी जबाबदारी शिकवून काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा देते, असे मत परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल यांनी व्यक्त केले.
जनता बँक स्टाफ वेल्फेअर सोसायटी, पुणे तर्फे बुधवार पेठेतील ७५ देवदासी भगिनींसोबत भाऊबीज साजरी करुन त्यांना धान्य किट ,मिठाई व साडीचोळी भेट देण्यात आले. बुधवार पेठेतील श्री नामदेव शिंपी समाज कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला जनता सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अॅड. अलका पेटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, सोसायटीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, संचालक नाना कांबळे, मिलिंद लिमये, पदमजा कुलकर्णी, रुपेश नाईक, कौस्तुभ खार्कुडीकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
तब्बल २५ वस्तू व धान्य तसेच मिठाई व साडीचोळी असलेले किट महिलांना भेट देण्यात आले. सोसायटीचे सचिन आंबेकर ,विजय फाटक,अभय ढमाले, अविनाश निरगुडे,विजय धोत्रे, नयन माने यांनी संयोजनात सहभाग घेतला.अॅड. अलका पेटकर म्हणाल्या, समाजाच्या प्रत्येक घटकाला सण-उत्सवामध्ये सामावून घेणे गरजेचे आहे. ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. बुधवार पेठेतील महिलांमध्ये ज्याप्रमाणे आपुलकीची भाऊबीज होत आहे, तरी सर्वत्र व्हायला हवी. जगदीश कश्यप म्हणाले, आपल्याला आर्थिक जबाबदारी सोबतच सामाजिक जबाबदारी देखील समजली पाहिजे. ती जबाबदारी आज जनता वेल्फेअर सोसायटीने घेऊन कृतीतून सत्यात उतरवून दाखविली आहे.
किशोर चव्हाण म्हणाले, आपल्या घरात दिवाळी साजरी करताना समाजातील प्रत्येक घरात दिवा लागला पाहिजे, या भावनेने जनता बँकेतील कर्मचा-यांनी सामाजिक दायीत्वाच्या भूमिकेतून हा उपक्रम राबविला आहे. सलग ५ वर्षे हा उपक्रम आम्ही राबवित आहोत. भावाकडून बहिणीला ओवाळणी म्हणून हे धान्य व वस्तूंचे किट तसेच साडीचोळी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शरद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.