पुणे : सावळा गं रामचंद्र… दशरथा घे हे पायसदान…आज मी शापमुक्त जाहलें…या इथे लक्ष्मणा बांध कुटी.. यांसह गीत रामायणातील ५६ गीते एक सलग एकाच दिवशी एकाच मंचावर कलाकारांनी सादर केली. तब्बल आठ तास चाललेल्या स्वरयज्ञात २५ हून अधिक कलाकारांनी सहभाग घेत सुरेल आवाजात गीते सादर करून रामचरित्राची अनुभूती दिली. शेकडो श्रोत्यांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात गीत रामायणाचा आनंद सोहळा रंगला.
हटके म्युझिक ग्रुपच्या वतीने ‘संपूर्ण गीत रामायण’ हा एका दिवसात गीत रामायणातील सर्व ५६ गीते सादर करण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शालेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी गदिमा यांच्या सुकन्या प्रियदर्शिनी अंतरकर आणि सुपुत्र आनंद माडगुळकर हे प्रमुख पाहुणे तर हटके ग्रुपचे संस्थापक, कार्यक्रमाचे सादरकर्ते शिरीष कुलकर्णी, सुमेधा कुलकर्णी, माधव धायगुडे यांसह कलाकार उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे सांगीतिक नियोजन जेष्ठ हार्मोनियम वादक आणि गायक अनिल मोटे यांनी केले होते.
आनंद माडगूळकर म्हणाले, गीत रामायण हे केवळ मनोरंजन नसून अनेकांंनी ते जीवनात अंगीकारले आहे. हटके ग्रुपने हाच वसा घेतला आहे व असे अनेक कार्यक्रम व्हावेत, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. शिरीष कुलकर्णी म्हणाले, हटके ग्रुपचा उद्देश सर्वांना आनंद देणे, नवोदितांना संधी देणे व सांगीतिक व्यावसायिकांना धन-निर्मितीची संधी या तिन्ही माध्यमातून सफल झाला.
गीतरामायणातील सर्व गीतांच्या सादरीकरणांमध्ये श्रोते रममाण होऊन गेले होते. सीतेच्या तोंडच्या काही तर गीतांच्या सादरीकरणाच्या वेळी श्रोत्यांचे डोळे पाणावले. नकोस नौके…सेतू बांधा रे सागरी… त्रिवार जयजयकार … अशा काही गीतांच्या बरोबरीने श्रोतेही गायक म्हणून सहभागी झाले. तर, दशरथा घे हे पायसदान…. हे गीत हार्मोनिका व व्हायोलिन यावर ‘हटके’ प्रकारे सादर झाले आणि श्रोत्यांनी त्याला भरभरून दाद दिली.
या सुमधुर गीतांच्या सादरीकरणासोबतच डॉ. मुकुंद कोठावदे यांनी प्रत्येेक गीतासाठी काढलेली ५६ रेखाचित्रेही दाखवली. आठ तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक अगदी समरस झालेले होते. गीतांच्या सादरीकरणांमध्ये सह कलाकारांमध्ये मातब्बर आणि अनुभवी साथीदार होते. चारुशीला गोसावी-व्हायोलिन, मोहन पारसनीस – तबला, संतोष अत्रे – हार्मोनियम, ओमकार पाटणकर – कीबोर्ड व विशेष म्हणजे तालवादक वसंत देव ज्यांनी विविध तालवाद्ये एकाच वेळी वाजवून अतिशय सुरेख साथ दिली. सहवादकांनी हटके ग्रुप चे या शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न, वाखाणण्यासारखा आहे, असे सांगितले. .हा कार्यक्रम “न भूतो न भविष्यती” असा झाल्याचे बऱ्याच प्रेक्षकांनी नमूद केले. असेच नवनवीन कार्यक्रम घेऊन हटके म्युझिक ग्रुप आपल्या समोर येत राहणार आहे, असा मानस शिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केला.