मुंबई- काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला. राजकीय जन्म काकांनीच दिला. तुम्हाला चुलत बहिण नको होती मग ओवाळायला का जाता? जे ऐश्वर्य मिळाले ते कुणामुळे? भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कुणी छळले, त्यामुळे भगीरथ बियाणीने आत्महत्या केली?, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला प्रत्युत्तर दिले आहे.दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही. बीडमध्ये मुंडे नावाच्या तरुणाला मारहाण झाली ती कुणी केली? आजही गुन्हा दाखल झाला नाही. कोण चोरडिया मला माहिती नाही. अंगाशी आल्यावर हे बालिश राजकारण करतायेत. शत्रू मोठा असला तरी काही गुप्तता बाळगायच्या असतात. आपल्या फायद्यासाठी नंतर गोष्टी काढायच्या नसतात.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 1999 साली पक्ष स्थापन झाला, याची स्थापना कोणी केली, महाराष्ट्रातील लहान पोरं देखील याचे उत्तर सांगतील शरद पवार यांनी केला. घड्याळ देशभरात कुणी नेलं, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, आसाममध्ये आमदार होते ते कुणामुळे होते.शरदचंद्र सिन्हा यांच्यासारखा काँग्रेसमधील वरिष्ठ नेता शरद पवारांसोबत उभा राहिला होता. केरळमध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी होते, या पक्षाला राष्ट्रीय नेतृत्त्व कुणामुळे मिळाले होते. तुम्हाला 5 जुलैच्या सभेत शरद पवारांचा फोटो कशासाठी वापरावा वाटला. कालपर्यंत तुम्ही शरद पवार आमचे दैवत आहेत, असे म्हणायचा आणि आज शरद पवारांवर एवढ्या गोळ्या घालण्याचे कारण काय? आणि कुणी गोळ्या झाडाव्यात, असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना विचारला आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी जे काही करतो माझ्या हिंमतीवर आणि ताकदीवर करतो. काहीही खोटे सांगू नका. तुमच्या प्रत्येक आरोपाचे पुरावे मी देऊ शकतो. कोणत्या फ्लाईटने कुठे गेला, रात्रीच्या अंधारातच दिल्लीला कसे जायचे असते हे सांगेन. शरद पवारांभोवतीच महाराष्ट्राचे राजकारण फिरत आहे. त्यामुळे त्यांची भाषणे पवारांवर आहे. शरद पवारांच्या नावाला स्पर्श केल्याशिवाय राजकीय उन्नती नाही हे सगळ्यांना माहिती असल्याने हे सर्व सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.