श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव
पुणे : आज धर्मावर बोलणारे खूप लोक आहेत, परंतु धर्मावर केवळ बोलून भागणार नाही तर धर्मामध्ये सांगितलेल्या तत्त्वानुसार आपले आचरणही ठेवले पाहिजे. केवळ धर्मावर बोलणाऱ्यांच्या मागे न जाता धर्मानुसार स्वतःचे आचरण असणाऱ्या व्यक्तींच्या मागे जर समाज उभा राहिला तर समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होते, असे मत गुरुनाथ बाबा औसेकर महाराज यांनी व्यक्त केले.
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी उत्सवात गुरुनाथ बाबा औसेकर महाराज यांचे ‘धर्मोपदेशक जगद्गुरु संत तुकाराम महाराज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
गुरुबाबा औसेकर महाराज म्हणाले,धर्मावर आधारित जर समाजाचा पाया असेल तर निश्चितच असा समाज जगाला दिशा दाखवू शकतो आणि हेच संत तुकाराम महाराज यांनी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी असे म्हणत सोळाव्या शतकामध्ये काम केले. त्यांच्या विचारांचे आपण जर आचरण केले तर केवळ आपलीच नव्हे तर समाजाची प्रगती होऊ शकेल.
दुष्काळामुळे होरपळलेल्या तसेच सामाजिक परिस्थितीने रंजलेल्या आणि धार्मिक गोंधळामुळे गांजलेल्या समाजाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी सोळाव्या शतकामध्ये जागे करण्याचे काम केले. समृद्ध आणि सुदृढ समाज निर्माण करण्यामध्ये संत तुकाराम महाराजांचे कार्य मोठे आहे