नवी दिल्ली, 16 एप्रिल 2024
भारतीय तटरक्षक दलाने 16 एप्रिल 2024 रोजी, कर्नाटक मधील कारवार जवळच्या समुद्रात अंदाजे 215 सागरी मैल अंतरावर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे संकटात सापडलेल्या आयएफबी रोझरी या भारतीय मासेमारी नौकेची यशस्वीपणे सुटका केली. आयएफबी रोझरी या नौकेने 13 एप्रिल 2024 रोजी आपत्कालीन मदतीसाठी दिलेल्या हाकेला भारतीय तटरक्षक दलाच्या सावित्रीबाई फुले या नौकेने त्वरित प्रतिसाद दिला आणि प्रतिकूल हवामानावर मात करत संकटग्रस्त नौकेशी संपर्क प्रस्थापित केला.
संकटग्रस्त नौकेवर पोहोचल्यावर भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजावरील बोर्डिंग पथकाने नौकेचे इंजिन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निष्फळ ठरल्यावर तटरक्षक दल जिल्हा मुख्यालयाच्या (कर्नाटक) आणि मत्स्य विभागाच्या सहकार्याने ही मासेमारी नौका कारवारच्या दिशेने नेण्यात आली. आयएफबी लक्ष्मी नारायण यांच्याकडे ती सुपूर्द करण्यात आली , त्यांनी ती सुरक्षितपणे कारवार बंदरात नेली .