श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री जंगली महाराज १३४ वा पुण्यतिथी उत्सव ; महोत्सवात राहुल देशपांडे यांचे सुश्राव्य गायन
पुणे : ‘लक्ष्मी वल्लभ दिनानाथा पद्मनाभा’, ‘तुका म्हणे भोगे पीडा’, ‘केली धावे देव’, ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग‘ अशा शास्त्रीय. उपशास्त्रीय संगीतासह भजन आणि संगीताचा आनंद रसिकांनी घेतला.
श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजित सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३४ व्या पुण्यतिथी उत्सवात राहुल देशपांडे यांच्या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीमध्ये त्यांनी शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतासह अभंग सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
‘प्रभू मोरे रे मै ना, की तू जाऊ रे’ या गीताने राहुल देशपांडे यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. राहुल देशपांडे यांचा भावपूर्ण आवाज, तबल्यावरील ठेका, संवादिनीचे स्वर आणि त्याचबरोबर या मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांनी दिलेली दाद यामुळे जंगली महाराज मंदिरातील वातावरण भक्तीमय आणि संगीतमय झाले होते.
‘सावरे माया जाऊ जमुना किनारे’, ‘तुका म्हणे भोगी पीडा ‘, ‘ वल्लभ दिनानाथा पद्मनाभा’, ‘सुख वसे तुझे पाय’ या गीतांनी राहुल देशपांडे यांनी हिंदुस्तानी संस्कृतीतील भक्तीरसाची रसिकांना अनुभूती दिली. ‘टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग’ या अभंगाने रसिक अक्षरशः दंगून गेले, टाळ्यांच्या स्वरूपामध्ये रसिक राहुल देशपांडे यांच्या मैफिलीमध्ये सहभागी झाले.