पुणे:
नवजात अर्भकांची पैशांसाठी तस्करी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. या महिलांनी पाच अर्भकांची तस्करी केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील सर्व सहा आरोपी महिला पुण्यातील असून, त्यात नामांकित रुग्णालयातील एका परिचारिकेचाही समावेश आहे.सईदा भीमराव कांबळे (वय ३५, रा. गोखलेनगर, शिवाजीनगर, पुणे), सुप्रिया शरद वाघमारे (वय ३९, रा. नवनाथ कॉलनी, केशवनगर, धनकवडी, पुणे), ललिता दत्तात्रेय गिरीगोसावी (वय ४५, रा. येरवडा), अफ्रिन दानेश शेख (वय २५, रा. पांढरेमळा, हडपसर), अमरीन रहीम सय्यद (वय ३२, रा लक्ष्मीनगर, येरवडा), आसमा जावेद शेख (वय ३०, रा. पांढरेमळा, हडपसर) अशी महिला आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाकड परिसरातील जगताप डेअरी परिसरात काही महिला अर्भकाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचला. दरम्यान, त्या ठिकाणी दोन रिक्षांतून सहा महिला आल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्यातीलच एका महिलेचे सात दिवसांचे अर्भक पाच लाख रुपयांना विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
ज्या दाम्पत्यांना वंध्यत्वाची समस्या आहे, अशांची माहिती या टोळीतील परिचारिका अन्य आरोपी महिलांना देत होती. त्यानंतर त्या दाम्पत्यांशी संपर्क साधून त्यांना पाच ते सात लाख रुपयांत बाळ विकत देण्याबाबत सांगत. ज्या दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, अशा दाम्पत्याला पैशांचे आमिष दाखवून या टोळीतील महिला अर्भक घेऊन व्यंध्यत्व समस्या असलेल्या दाम्पत्याला विकत होते. ज्या दाम्पत्यांनी या टोळीतील महिलांकडून अर्भक घेतले आहे. अशा दाम्पत्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.