पुणे-मंत्र्यांनी केलेल्या गलिच्छ वक्तव्यावर कारवाई झालीच पाहिजे,असे सांगत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.बारामती लोकसभा मतदार संघातून अपक्ष लढण्याची तयारी करणारे विजय शिवतारे अचानक शांत झाले आहेत. या दरम्यान त्यांनी आपल्याला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरीष्ठ नेते फोन करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. तो नेता कोण होता? हे मलाही समजून घ्यायचे असल्याचे बारामती लोकसभा मतदार संघातील शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेआहे.
नरेंद्र मोदी हे एका पक्षाचे नव्हे तर या देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांच्या पक्षाच्या एका उमेदवाराने व्यासपीठावरुन गलिच्छ भाषा वापरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर गलिच्छ वाक्य बोलले गेले, हे थांबले पाहिजे. मी स्वतः याचा जाहीर निषेध करत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी देखील पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यांच्या पदावरील माणसांचा सन्मान ठेवायला हवा होता. अशा मंत्र्यांनी केलेल्या गलिच्छ वक्तव्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
डिसेंबर महिन्यापासून मी दुष्काळी परिस्थिती बाबत विविध प्रकारच्या मागण्या करत आहेत. राज्यातील मजूर अडचणीत आहेत, अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत. इतर घटकांसह सर्वजण अनेक अडचणीत सापडले आहे. उजनी धरण्यात एक थेंब पाणी नाही. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ 35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दोन अडीच महिने तरी पाणी पुरेल का? अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे. असे असताना ट्रिपल इंजिनचे सरकार अतिशय असंवेदनशील दिसत आहे. राज्य सरकार केवळ पक्ष फोडाफोडीचे काम करत आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.