ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी १५० पेक्षा जास्त शहरांत विस्तार
पुणे10 एप्रिल 2024 – पीएनबी हाउसिंग फायनान्स या भारतातील आघाडीच्या गृह कर्ज कंपनीने आज त्यांचे वितरण नेटवर्क भारतात ३०० शाखांपर्यंत विस्तारल्याची घोषणा केली. हा धोरणात्मक विकास ग्राहकांना गृह कर्जाचे विविध पर्याय सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या प्रवासातील लक्षणीय टप्पा आहे. देशभरातील १५० पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरलेल्या शाखांसह पीएनबी हाउसिंग फायनान्सला आता लाखो लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणे तसेच राष्ट्र उभारणीसाठी मोलाचे योगदान देणे शक्य होईल.
पीएनबी हाउसिंग फायनान्स आर्थिक वर्ष २४ च्या केवळ चार महिन्यांत १०० शाखा समाविष्ट करत शाखांची एकूण संख्या ३०० वर नेली. कंपनीतर्फे गृह कर्ज पुरवणाऱ्या ९० शाखांच्या माध्यमातून खास तयार केलेल्या वित्त सुविधा पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे १६० शाखांचे दमदार नेटवर्क वाजवी घरांचा रोशनी हा विभाग हाताळण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने ‘इमर्जिंग मार्केट्स’ या नव्या विभागातही प्रवेश केला असून त्याद्वारे निवडक ठिकाणच्या १५० शाखांच्या माध्यमातून उच्च उत्पन्नधारक ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे.
पीएनबी हाउसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरीश कौसगी म्हणाले, ‘ग्राहकांची घर खरेदी करण्याची महत्त्वाकांक्षा समजून घेणारी कंपनी या नात्याने आम्ही आमचे बहुआयामी अस्तित्व मजबूत करण्याचे आणि ग्राहकांना गृह वित्त सुविधा पुरवण्यासाठी वितरण नेटवर्क वाढवण्याचे धोरणात्मक पाऊल उचलले. ३०० शाखांच्या विस्तृत नेटवर्कमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांना सेवा देणे व कंपनीचा नफा वाढवणे आम्हाला शक्य होणार आहे. या प्रवासात पुढे जाण्यासाठी आणि विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
पीएनबी हाउसिंग फायनान्सतर्फे विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध करून दिली जातात. त्यामध्ये वैयक्तिक गृह कर्ज, मालमत्तेवर रिटेल कर्ज, रिटेल नॉन- रेसिडेन्शियल प्रीमायसेस कर्ज आणि पगारदार तसेच स्वयंरोजगार मिळवणाऱ्या व्यक्तींना निश्चित ठेव सुविधा पुरवणे यांचा समावेश आहे. कंपनीच्या शाखांमध्ये दमदार तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा बसवण्यात आल्या असून त्याला कार्यक्षम कामकाज आणि दमदार प्रशासकीय फ्रेमवर्कची जोड देऊन ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे.