‘जर्नि ऑफ ग्लोबल राइझ ऑफ इंडिया’ या विषयावर शुक्रवारी व्याख्यान
पुणे-
आश्वासक युवा पिढीला संधीचे नवे जागतिक द्वार उघडुन देणारा विकसित भारताचा संकल्प मांडण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ‘जर्नि ऑफ ग्लोबल राइझ ऑफ इंडिया’ या विषयावर पुण्यातील युवकांशी संवाद साधणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी (ता. 12 एप्रिल) सायंकाळी 5.00 वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पांडे आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष पुनीत जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
देशाचे रॉकस्टार फॉरेन मिनिस्टर अशी ओळख असलेले एस जयशंकर यांनी अवघ्या पाच वर्षांत भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा साफ बदलवली. कोणत्याही कुरापती खपवून न घेणारे आणि त्याचवेळी जगाच्या कल्याणाचा विचार करणारे जबाबदार राष्ट्र अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यापूर्वीच त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रशासकीय अनुभव, त्यांची कार्यशैली यामुळे ते युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.
पत्र परिषदेत कार्यक्रमाची माहिती सांगताना पांडे म्हणाले “विकासाची भूक असणारे, झपाट्याने प्रगती करणारे, स्वतःच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वस्व पणाला लावणारे राष्ट्र म्हणून भारत जगाच्या पटलावर पुढे आला. यासाठी मोलाची भूमिका बजावणारे, युवकांमध्ये लोकप्रिय रॉकस्टार फॉरेन मिनिस्टर पुण्यात येणार आहेत, हे पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. भारताचे परराष्ट्र धोरण पुण्यावर थेट परिणाम करते. कारण, पुणे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात थेट आंतरराष्ट्रीय संस्थांशी जोडलेले आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, शेतीमाल प्रक्रिया, औषधनिर्माण ही उद्योगांची पाच क्षेत्रे पुण्यातून जगाशी व्यवहार करतात. भारतातून दरवर्षी सुमारे दहा लाख विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा १२.५ टक्के आहे. त्यामध्ये पुण्याचा वाटा सर्वाधिक आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल पुणे अत्यंत जागरूक महानगर आहे. म्हणून भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुणेकरांशी संवाद साधणे महत्वाचे आहे.”
जोशी म्हणाले, “राजनैतिक भाषेचा सफाईदारपणा, निस्सीम देशभक्ती आणि देशासमोरील प्रश्नांची नेमकी जाण एस. जयशंकर यांना आहे. जग भारताकडे कसे पाहाते याबद्दल आजच्या तरुण पिढीला सतत उत्सुकता असते. जगात भारताची मान उंचावत आहे याचा तरुण वर्गाला अभिमान आहे. जयशंकर यांचे एकएक विधान तरुण वर्ग उत्साहाने पाहातो, ऐकतो आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवतो. असे कर्तृत्ववान परराष्ट्रमंत्री पुण्यातील तरूणाईशी खास संवाद साधणार आहेत. पुणेकरांनी या व्याख्यानाला मोठा प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करतो.”