पुणे, दि. ०५ एप्रिल २०२४: नवीन आर्थिक वर्षामध्ये पुणे परिमंडलातील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘तत्पर ग्राहकसेवा’, ‘महसूलवाढ’ व वीजबिलांची ‘शून्य थकबाकी’ या त्रिसूत्रीला प्राधान्य द्यावे. यासोबतच ‘इज ऑफ लिव्हिंग’नुसार (राहणीमान सुलभता) आणि कृती मानंकानुसार निश्चित केलेल्या कालावधीत सेवा देण्यासाठी प्रत्येकाने सजग राहावे असे निर्देश महावितरणचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले.
रास्तापेठ येथील ‘प्रकाशदीप’ सभागृहामध्ये शुक्रवारी (दि. ५) पुणे परिमंडलाची वार्षिक आढावा बैठक झाली. यात श्री. पवार यांनी ग्राहकसेवेसह मागील वर्षात केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला व त्यासंदर्भात प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. संजीव राठोड, श्री. संजीव नेहेते, श्री. अमित कुलकर्णी, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त व लेखा) व ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) यांची उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. पवार यांनी सांगितले की, सन २०२३-२४ आर्थिक वर्षात पुणे परिमंडलाने विविध आघाड्यांवर रिजल्ट ओरिएंटेड पद्धतीने काम केले आहे. त्यामुळे सर्वच बाबतीत तुलनात्मक यश देखील चांगले मिळाले आहे. मागील आर्थिक वर्षात २ लाख ३८ हजार नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. महसूलमध्ये १४ टक्क्यांनी तर वसूली कार्यक्षमतेत १५.५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुणे परिमंडलाचा महसूल गेल्या महिन्यात १६५६ कोटी ७० लाख रुपयांवर गेला आहे. सोबतच वीजहानी व वीजबिलांच्या थकबाकीमध्ये घट करण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे.
ते पुढे म्हणाले, वीजक्षेत्रात काल केलेल्या कामगिरीवर आज तगू शकत नाही हे वास्तव आहे. तसेच कोणत्याही सेवा क्षेत्रात कृती मानकांनुसार निश्चित कालावधीत सेवा मिळाली तरच ग्राहकांचे समाधान होते. त्यामुळे अशी तत्पर सेवा देण्यासोबतच अचूक बिलींगसह विविध उपाययोजनांमधून महावितरणचा महसूल आणखी वाढवणे व वीजबिलांची थकबाकी शून्य करणे यास प्राधान्य देत दैनंदिन कामकाज गतिमान करण्याची सूचना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी यावेळी केली.
या आढावा बैठकीमध्ये मागील आर्थिक वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या पुणे परिमंडलातील विविध कार्यालयांचा मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पाटणी यांनी केले व आभार मानले. यावेळी मंडल, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयांचे अभियंता, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.