स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
पुणे: जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदार संघातील स्ट्राँग रुमला भेट देऊन स्ट्राँग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी, असे निर्देश दिले.
डॉ. दिवसे यांनी आज पिंपरी विधानसभा मतदार संघ कार्यालयांतर्गत ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र आणि निगडी प्राधिकरण येथील डॉ. हेडगेवार भवनातील स्ट्राँग रूम, थेरगाव येथील स्व. शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम, साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र, देहूरोड येथील मतदान केंद्र, सोमाटणे येथील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्र व नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्लॉलॉजी तळेगाव दाभाडे येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली.
त्यांनी स्टाँगरूम व्यवस्थापन, नियोजनाबाबत आढावा घेतला. मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, सीसीटिव्ही यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची बारकाईने चाचणी करण्यात यावी, तसेच त्याठिकाणी २४x७ आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पिंपरीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपआयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विठ्ठल जोशी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी पिंपरी येथे आयोजित क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाचीही पाहणी करुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी श्री. नवले यांनी मावळ विधानसभा मतदार संघातील पूर्वतयारी व नियोजनाबाबत माहिती दिली. मावळ मतदार संघामध्ये एकूण ३९० मतदान केंद्र आहेत. एकूण ४५ सेक्टर ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येकी ६ फिरती पथके (एफएसटी) व स्थीर निरीक्षण पथके (एसएसटी), ३ व्हीएसटी व २ व्हिडीओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) व १ उमेदवार खर्च नोंदणी पथक अशी पथके कार्यान्वित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
चिंचवड मतदार संघामध्ये एकूण ५४९ मतदान केंद्र आहेत. १०० टक्के एपिक रजिस्ट्रेशन झालेले आहे. एकूण ४८ सेक्टर ऑफिसर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच ६ एफएसटी, ६ एसएसटी, २ व्हीएसटी व १ व्हीव्हीटी व एक अकाउंटिंग टीम अशा टीम कार्यान्वित करण्यात आलेली असल्याचे श्री. जोशी यांनी सांगितले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ इमारतीमध्ये एकूण ३९९ मतदान केंद्र असून सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आहेत, अशी माहिती अर्चना यादव यांनी दिली.