या पूर्वी कॉंग्रेसमधून लढून भाजपच्या राम नाईकांचा केला होता पराभव
मुंबई-सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता,कॉंग्रेसचे माजी खासदार गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत गुरुवारी सायंकाळी प्रवेश केला. २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात उतरलेले अभिनेते गोविंदा यांनी भाजपचे केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या राम नाईक यांनी ५ वेळा जिंकलेला भाजपाचा राखलेला गड खालसा केला होता. जवळपास ५० हजारांचं मताधिक्य मिळवत गोविंदा यांनी राम नाईक यांचा पराभव केला होता. नाईकांना ५ लाख ११ हजार ४९२, तर गोविंदा यांना ५ लाख ५९ हजार ७६३ मतं मिळाली होती.
उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याच वेळी त्यांच्याविरोधात महायुतीकडून कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नव्हती. अखेर आज गोविंदाने बाळासाहेब भवन येथे शिंदे गटात प्रवेश करून उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले.