पुणे,दि.27 – शिरुर लोकसभा मतदारसंघातील मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेजजवळील आदिवासी बहुल भागात स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे यासाठी समाजातील विविध घटकांच्या सहभागाने प्रशासनातर्फे विविध जनजागृतीचे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. मतदान प्रक्रियेत मतदानाचे प्रमाण व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वाढावा यासाठी स्वीप अंतर्गत व्यापक जनजागृतीवर भर देण्यात आला असून मतदार जनजागृतीसाठी ग्रामीण भागामध्ये उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून शिरुर मतदारसंघात व्यापक प्रमाणात जनजागृतीवर भर देण्यात आला आहे.‘युवकांचे मतदान-राष्ट्र निर्माणातील योगदान’ जागृत नागरिक होऊ या-अभिमानाने मत देवू या, या व अशाप्रकारच्या विविध घेाषणा फलकांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेविषयी आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आदिवासी भागात पथकाने मार्गदर्शन केले. मतदानाचा दिनांक, मतदानाचा कालावधी तसेच मतदान केंद्रावरील सुविधा याबाबत नव मतदार, तरुण, वयोवृद्ध नागरिकांना माहिती देण्यात आली. यावेळी अंबेगाव तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
आंबेगाव येथे मतदारांकडून मतदान करण्याबाबत संकल्पपत्र भरून घेण्यात आले. तसेच त्यांना मतदान केंद्राची माहिती कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातर्फे मतदार जागृती फेरी आणि व्याख्यानाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात आली.