mपिंपरी, पुणे (दि. २३ मार्च २०२४) आयुष्यात यशस्वी होण्यासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. म्हणजे स्वप्नांना गवसणी घालता येईल. आज तुम्ही फिजिओथेरपी पदवी प्राप्त केली. हे यश संपादन करताना आई – वडील, शिक्षकांनी तुमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला तडा जाऊ देऊ नका. फिजिओथेरपी डॉक्टर म्हणून उत्तम सेवा प्रदान करा, असे प्रतिपादन चाकण नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी संदीप चिद्रावार यांनी केले.
स्व. फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशनच्या निगडी येथील फकिरभाई पानसरे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा सातवा पदवी प्रदान समारंभ प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. संजीव कुमार पाटील, जॉर्न जोशेफ, जॉर्डन संसारे, स्व. फकिरभाई पानसरे एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष निहाल आझम पानसरे, संचालिका डॉ. झोया पानसरे, संचालक डॉ. श्याम अहिरराव, प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांची संवाद साधताना डॉ. झोया पानसरे म्हणाल्या, तुम्ही फिजिओथेरपीचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केली आहे. पुढील काळात फिजिओथेरपिस्ट म्हणून जबाबदारीने काम करा. आपल्या ज्ञानाचा समाजाला उत्तम सेवा देण्यासाठी उपयोग करा, असे डॉ. झोया पानसरे यांनी सांगितले.
आपल्याला पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे समजू नका. शिक्षण निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सातत्याने नवनवीन शिक्षण, संशोधन, अनुभव यांचा ज्ञान रूपी संचय जमा करा. उपचारासाठी आलेल्या रूग्णांना धीर दिला पाहिजे. गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करून त्यांना मदत करा. आपले आईवडील, गुरूजनांना विसरू नका; याप्रमाणे कार्य करीत राहिलात तर पुढील आयुष्यात यशोशिखरावर पोहचाल असे डॉ. श्याम अहिरराव म्हणाले.
प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी महाविद्यालयाच्या कार्याचा आढावा घेतला. राजू शिंगोटे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट विद्यार्थी डॉ. शराण्या बापट, डॉ. प्रांजली झेंडे, उत्कृष्ट शिक्षक – डॉ. भाग्यश्री बडवे आणि महाविद्यालयाच्या समर्पित कामगिरीसाठी राजू शिंगोटे यांना गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व वरिष्ठ शिक्षकांनी योगदान दिले. पारितोषिक वितरणाचे संचालन डॉ. श्रुती मुळावकर यांनी केले. स्वागत डॉ. मानसी चौधरी, डॉ. एकता पाटील, सूत्रसंचालन डॉ. नेहा देशपांडे यांनी तर डॉ. लावण्या अय्यर यांनी आभार मानले.