मुंबई: एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी हा पक्ष नकली आहे हे देशातील तिघांना नक्की माहिती आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा समावेश असून ते त्यांचा तात्पुरता वापर करत आहेत.आता शिंदे यांचा वापर संपला असून भाजपच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष संपवणार आहेत, अशी परखड टीका कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी केली.
आम्ही निर्भय वरळीकर तर्फे ‘निर्भय बनो सभेचे’ आयोजन वरळी येथील बीडीडी चाळीतील वीर सुभाष मैदानात सोमवारी करण्यात आले होते. यावेळी सरोदे बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी उपस्थित होते. भाजप हा भ्रष्टाचारी आणि धर्मांध आहे. भाजप हा कायदा करून घोटाळा करत आहे. निवडणूक रोख्यांचा घोटाळा तसाच आहे.
”तुम मुझे चंदा दो, मे तुम्हे धंदा दुंगा” असा निवडणूक रोख्यांचा घोटाळा आहे. आता पुढे पीएम केअर फंडाचाही घोटाळा लवकरच समोर येईल, अशीही टीका सरोदे यांनी केले. मोदी यांनी देशाला कर्जबाजारी केले. राज्यात तेच मॉडेल राबविले जात आहे. पालिकेला कर्जबाजारी केले जाणार आहे. हे सरकार मुंबईचा सत्यानाश करत आहेत. मुंबईत लोकांना किमान सुविधा मिळत नसताना सुशोभीकरणावर कोट्यवधी खर्च करत आहेत, अशी टीकाही चौधरी यांनी केली.
…तर राहुल नार्वेकर यांच्याविरोधात सभा घेऊ!
राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे. भाजपने दक्षिण मुंबई मतदारसंघात त्यांना उमेदवारी दिली तर त्यांच्याविरोधात या मतदार संघात आम्ही निर्भय बनोच्या माध्यमातून दोन सभा घेऊ, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी दिला.