बारामती- अजित पवार नालायक माणूस आहे, वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान त्यांना ठेवता आला नाही, अशी खरमरीत टीका अजित पवार यांची सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केली आहे. श्रीनिवास पवार यांच्या या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील वाद आता चांगलाच टीकेला पोहोचला असल्याचे दिसून येत आहे. श्रीनिवास पवार यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि पुतणे रोहित पवार यांनी देखील पवार कुटुंबीयांच्या या वादावर आपले मत व्यक्त केले, त्यामुळे पवार कुटुंबातील वादाची चांगलीच चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात दिसून येत आहे.
अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आता राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बैठक घेत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नाही. आपण औषध विकत आणतो तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट असते, तशी नात्यांना देखील एक्सपायरी डेट असते. आता वाईट वाईट वाटून घ्यायचे नाही. मला दाबून जगायचे नाही तर स्वाभिमानाने जगायचे असल्याचे मत श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केले. ज्यांना पदे मिळाली आहेत ती शरद पवार यांच्यामुळेच मिळाली आहे. त्याच साहेबांना आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा, असे म्हणत आहात. हे माझ्या मनाला पटणार नाही असे देखील श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.
श्रीनिवास पवार यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या घरात वडीलधारी माणसे आहेत. आपली ओळख शरद पवार यांच्यामुळेच आहे. साहेबांनी आपल्यासाठी काय केले? हा प्रश्न विचारणे म्हणजे आई-वडिलांनी माझ्यासाठी काय केले? असे विचारण्यासारखे असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले आहे. शेवटी कुटुंब हे वडीलधारी लोकांपासूनच सुरू होते. साहेबांनी इतक्या वर्षात माती खाल्ली का? आपण त्याला कारणीभूत होऊयात का? आपण त्याला गालबोट लावायचे का? असा प्रश्न शर्मिला पवार यांनी उपस्थित केला. कोणाला यश मिळेल हा मुद्दा नसून केवळ साहेबांना विजयी करायचा आहे, हा मुद्दा असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले आहे.
श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात थेट भूमिका घेतल्यामुळे पवार कुटुंबातील वाद टीकेला गेला असल्याचे बोलले जात आहे. श्रीनिवास पवार यांची भूमिका ही सर्वसामान्य नागरिकांची भूमिका असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या सुनेत्रा पवार यांना घरातूनच मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यात आमदार रोहित पवार हे आधीपासूनच शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांची साथ देत आहेत. त्यात आता श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांचा देखील समावेश झाला आहे.
आमदार रोहित पवार यांची आई सुनंदा पवार आणि बहीण सई पवार यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना सुनंदा पवार आणि सई पवार या देखील सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अख्खे पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचे बोलले जात आहे.
बारामती मध्ये झालेल्या एका सभेदरम्यान अजित पवार यांनी आधीच या सर्व प्रकरणाबद्दल खंत व्यक्त केली होती. पवार कुटुंबातील एकही व्यक्ती आपल्या सोबत नसेल, सर्व माझ्या विरोधात प्रचाराला उतरतील, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. अजित पवार यांचे हे वक्तव्य खरे होताना दिसत आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचारासाठी आता संपूर्ण पवार कुटुंब असल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळत आहे.
पवार कुटुंबातील सध्या चित्र पाहता या संदर्भात सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या संदर्भातले फोटोज आणि रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये संपूर्ण पवार कुटुंब हे शरद पवार यांच्यासोबत कसे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची ही लढाई पवार विरुद्ध पवार होणार असून आता ती प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. एकंदरीत संपूर्ण पवार कुटुंब हे सुप्रिया सुळे यांच्या बाजूने लढत असल्याने अजित पवार यांच्या समोरील अडचणी आणखीनच वाढल्या आहेत.