मुंबई दि.१५: राज्यशासनाने ३१ ऑक्टोबर, २०२३ मध्ये शासननिर्णयाद्वारे दुष्काळी तालुके जाहीर केले आहेत. तसेच १० नोव्हेंबर २०२३ व १६ फेब्रुवारी २०२४ मध्ये महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केली आहे. या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागात ज्या सवलतीस शासनाने मंजुरी दिली आहे. त्यात शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी केलेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी तात्काळ अंमलबजावणी करावी असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कुलसचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर यांना लेखी पत्राद्वारे दिले आहेत.
तसेच ज्या महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क वसूल केले आहे अशा महाविद्यालयांनी सदर शुल्क परत करणे अपेक्षित असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निर्देश्यात स्पष्ट केले आहे.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिनांक १३ मार्च २०२४ रोजी मराठवाड्यातील सर्व ८ ही जिल्ह्याची दुष्काळ परिस्थिती व त्यावरील उपाय योजना बाबत विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे बैठक घेतली होती. याबैठकीला ऑनलाईन द्वारे ८ ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व विविध विभागाचे अधिकारी हजर होते. मात्र विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे याबाबत नाराजी व्यक्ती केली होती. त्यामुळे लेखी निर्देश आज रोजी देण्यात आले व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा अशी निर्देश ही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.