मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची ग्राहकसंवादात माहिती
पुणे, दि. १५ मार्च २०२४: छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पातून दरमहा तब्बल ३०० युनिटपर्यंत वीजग्राहकांना मोफत वीज मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंमलबजावणीसाठी पुणे परिमंडलातील प्रशिक्षित अधिकारी व कर्मचारी सज्ज आहेत. या योजनेतून सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी संबंधित ग्राहकांना कोणतीही हयगय न करता तत्पर सेवा व सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहे अशी माहिती मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.
रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहात प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील लाभार्थी ग्राहकांशी मुख्य अभियंता श्री. पवार यांनी नुकताच संवाद साधला. त्यांच्याकडून अपेक्षा व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. संजीव राठोड, कार्यकारी अभियंता श्री. धनराज बिक्कड, प्रणाली विश्लेषक श्री. बाळकृष्ण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाच्या एक किलोवॅट क्षमतेतून दरमहा १२० युनिट, दोन किलोवॅटपर्यंत दरमहा दीडशे युनिट तसेच तीन किलोवॅटपर्यंत दीडशे ते ३०० युनिट वीज मिळणार आहे. यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. या योजनेस पुणे परिमंडलामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत प्राप्त झालेल्या ६६२ अर्जांप्रमाणे संबंधित ग्राहकांकडे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पुणे परिमंडलामध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मोठा वेग देण्यात आला आहे. त्यामुळे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षभरात ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महावितरणचे अभियंता, कर्मचारी तसेच एजन्सीजचे कर्मचारी यांना सातत्याने प्रशिक्षण देण्यात येत आहे. छतावरील सौर प्रकल्प उभारणीसाठी महावितरणशी संबंधित सर्व ग्राहकसेवा तत्परतेने उपलब्ध होईल याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. आतापर्यंत पुणे परिमंडलातील २ हजार ६९२ घरगुती वीजग्राहकांनी केंद्र शासनाकडून सुरू असलेल्या यापूर्वीच्या अनुदानाचा लाभ घेत १४.९१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प घराच्या छतावर कार्यान्वित केले आहेत. आता प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत देखील प्रतिसाद वाढला आहे, अशी माहिती मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.
प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर किंवा पीएम सूर्यघर नावाच्या मोबाईल अॅपवर नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. पवार यांनी केले. कार्यक्रमात उपस्थित वीजग्राहकांनी महावितरणकडून मिळणाऱ्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील घरगुती वीजग्राहक नरहरी खांदवे, मेघा राजेंद्र मोरे, राजेंद्र मोरे, मनोज पाटील, आदिक बाबर, ग्रुपकॅप्टन डी. एस. राजपूत, दिलीप मावळे, नीलेश शेवाळे, रमेश शिर्के, सूरज शिंगारे आदींसह अभियंता, अधिकारी उपस्थित होते.