पुणे- गेल्या ५ वर्षाच्या सत्रात महापालिकेत सत्ता असताना, दरवर्षी पदाधिकारी बदलाचा ट्रेंड बदलून स्थायी समिती अध्यक्ष पद,त्यानंतर तब्बल ३ वर्षे महापौर पद अशी सुमारे ४ वर्षाहून अधिक काल शहराची महत्वपूर्ण जबाबदारी सोपविल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांच्याच गळ्यात पुन्हा लोकसभेच्या उमेदवारीची माळ भाजपच्या नेत्यांनी घातल्यावर भाजपच्या नेत्यांच्या मानसिकतेत कोणताही बदल झाला नसल्याचा सूर भाजपच्याच नगरसेवक वर्तुळातून उमटतो आहे. गेल्या सत्रात त्याच त्याच लोकांना भाजपा संधी देते आहे असा आरोप सातत्याने होत आला होता आता केवळ कोथरूड मधूनच भाजपा आहे कि काय ? कोथरूडच्या बाहेर भाजपा नाही काय ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. नुकतेच कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभा देऊन त्यांना खासदार करण्यात आले आहे.एक खासदार कोथरूड मध्ये भाजपचाच आहेच, या शिवाय कोथरूडचे विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटीलांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. कोथरूड मध्येच पदांची खिरापत नेते वाटत असल्याचा आरोप होत आला आहे त्यास आणखी बळकटी आता मिळते आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या पारड्यात मात्र यश मिळण्याची शक्यता आता आणखी वाढली आहे. अर्थात कॉंग्रेसला देखील चांगला उमेदवार देणे क्रमप्राप्त आहे.आणि चांगल्या उमेदवारांनी थेट राहुल गांधींच्या पर्यंत पोहोचणे क्रमप्राप्त होणार आहे. महापालिकेतला गेल्या सत्रातला कारभार फक्त मेट्रो पुण्यात झाली असल्याचेच दर्शवित आला आहे ज्याचे संपूर्ण श्रेय मात्र भाजपा घेऊ शकेल काय ? हे पाहावे लागणार आहे. मेट्रो शिवाय गेल्या ७ वर्षात कोणताही नवा प्रकल्प पुण्यात होऊ शकलेला नाही. रोजगार,महागाई,वाहतूक,पर्यावरण अशा असंख्य प्रश्नांकडे तत्कालीन भाजपा सत्ताधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत राहणार आहे.