मुंबई-‘मराठा आरक्षणाला ना सरकारचा विरोध आहे ना छगन भुजबळांचा. फक्त हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही एवढीच भुजबळांची भूमिका अाहे. सरकारचेही तेच मत आहे,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले.
सरसकट सर्वच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ ठिकठिकाणी मेळावे घेऊन आपल्याच सरकारविरोधात वक्तव्ये करत आहेत. त्यांना ओबीसी समाजातून मोठा प्रतिसादही मिळत आहेत. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारमध्ये दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी फोनवरून पुण्यात असलेल्या भुजबळांशी चर्चा करून त्यांच्या भूमिकेशी सरकार सहमत असल्याचे सांगितले. पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘मराठा आरक्षणाला भुजबळांचा विरोध नाही. सरकार इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे.
भुजबळांची व सरकारची भूमिका सारखीच आहे. आमच्यात कुठलेही गैरसमज नाहीत.’ भुजबळ म्हणाले, ‘होय, मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनी ओबीसी व इतर कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी होणार नाही असा शब्द दिला आहे. त्यावर मी समाधानी आहे.’