लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 8 मार्च रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. शुक्रवारी संध्याकाळी 7.15 वाजता पक्षाने 39 उमेदवारांची घोषणा केली. या यादीनुसार राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. ते आजही तेथून खासदार आहेत. राहुल यांच्याशिवाय भूपेश बघेल आणि शशी थरूर यांचीही नावे यादीत आहेत.2 मार्च रोजी भाजपने 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 195 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. भाजपच्या यादीनंतर 15 दिवसांनी काँग्रेसची पहिली यादी आली आहे.काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश नाही.
राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून लढणार असल्याने अमेठीमधून कोण उभं राहणार हे अद्याप अस्पष्ट आहे. या ठिकाणाहून प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. रायबरेलीमधूनही प्रियंका गांधी यांच्या नावाची चर्चा आहे.
शशी थरूर पुन्हा तिरुवनंतपूरमधून लढणार
काँग्रेसच्या उमेदवारांच्या यादीत खासदार शशी थरूर हे तिरुवनंतपुरममधून निवडणूक लढवणार आहेत. तर छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, ताम्रध्वज साहू, ज्योत्स्ना महंत आणि शिव देहरिया यांचा अनुक्रमे राजनांदगाव, दुर्ग, कोरबा आणि जांजगीर-चंपा मतदारसंघातून विचार करण्यात आला.
कर्नाटकमधील आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अद्याप चार ते पाच जागांवर अंतिम निर्णय झालेला नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पारंपरिक गुलबर्गा या मतदारसंघातून यावेळी त्यांचे जावई राधाकृष्ण दोड्डामणी हे तिकीटासाठी आग्रही असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
दरम्यान, भाजपकडूनही पहिली यादी 195 उमेदवारांची घोषित करण्यात आली असली, तरी महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाची घोषणा झालेली नाही. यावरून महायुतीमध्ये असलेल्या जागावाटपावरून सुरु असलेल्या घडामोडींचा अंदाज येतो. दुसरीकडे, काँग्रेसकडूनही पहिल्या यादीत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही एकमत झालेलं नाही.