पुणे, दि. ८ : भिमाशंकर येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांना निसर्गाची माहिती देणाऱ्या महादेव वन निसर्ग परिचय केंद्राचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्धाटन केले. हे केंद्र भाविक व पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला मुख्य वनसंरक्षक (प्रा.) एन.आर.प्रविण, उपवनसंरक्षक वन्यजीव तुषार चव्हाण, निवृत्त मुख्य वनसंरक्षक रविंद्र वानखेडे, सहाय्यक वनसंरक्षक किशोर येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण, भाऊसाहेब जवरे, भिमाशंकर देवस्थान संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्यासह भिमाशंकर अभयारण्य कर्मचारी उपस्थित होते.
या महादेव वन निसर्ग परिचय केंद्रात निसर्ग प्रेमींना पश्चिम घाटातील जैवविधता, औषधी वनस्पती तसेच वन्यप्राण्यांची माहिती देण्यात आली असून विविध प्रकारचे माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. महादेव वनातील इंडिया मॅपमध्ये भारतातील बारा ज्योर्तिलिंग दर्शक नकाशा याचीही माहिती दर्शविण्यात आली आहे.